अमेरिकेचा हल्ला रोखण्यासाठी सिरीयाची संयुक्त राष्ट्रांकडे धाव

सिरीयावर हल्ला करण्यासाठी अमेरिका देशाचा तसेच मित्रराष्ट्रांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतानाच सिरीयाने अमेरिकेचा सिरीयावरचा हा हल्ला रोखला जावा यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली असल्याचे समजते.

सिरीयातील असद सरकारने २१ ऑगस्ट रोजी केलेल्या रासायनिक हल्लयात १४२९ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचे कारण देऊन अमेरिका सिरीयावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. मात्र सिरीयाने रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप फेटाळला असून अमेरिकेचा हल्लां झाला तर त्याचा गैरफायदा अल कायदा व त्यांच्याशी संबंधित संघटना घेतील अशी भीती व्यक्त करत संयुक्त राष्ट्रसंघाला हा हल्ला रोखण्यासाठी मध्यस्ती करण्याचे आवाहन केले आहे. सिरीयाचे प्रतिनिधी बशर अल जाफरी यांनी तसे पत्र राष्ट्रसंघाकडे रवाना केले आहे असे समजते.

या पत्रात बशर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाने सिरीयाच्या प्रश्नावर शांतीपूर्व मार्गाने तोडगा काढला जावा अशी विनंती केली आहे.