सौदी राजाकडून हिलरींना मिळाल्या महागड्या भेटी

गेल्या वर्षात अमेरिकन अधिकारी आणि राजकीय नेत्यांना विविध राष्ट्रांकडून मिळालेल्या भेटींची यादी विदेश मंत्रालयाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांना सौदी राजाकडून नेकलेस, ब्रेसलेट, अंगठी, झुमके असे रत्नजडीत दागिने भेट म्हणून दिले गेले असून त्याची किंमत आहे ५० हजार डॉलर्स. रूपयांत हे मूल्य ३८ लाख रूपये इतके आहे. सौदीचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज यांच्याकडून या भेटी हिलरी यांना २०१२ सालात दिल्या गेल्या आहेत. विदेश मंत्रालयाने अशी १०० भेटींची यादी प्रसिद्ध केली आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या देशाच्या भेटीवर आलेल्या महत्त्वाच्या नेत्यांना अशा भेटी देण्याची परंपरा फार जुनी आहे. आलेल्या नेत्याला अथवा अधिकार्‍याला मान देण्यासाठी अशा भेटी दिल्या जातात. हिलरी यांच्याप्रमाणेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल, उपराष्ट्रपती जो बिडेन, यांच्या पत्नी, सीआयए प्रमुख डेव्हिड पॉवेल, चीफ जस्टीस गॉन रॉबर्टस यांनाही अशा भेटी दिल्या गेल्या आहेत. त्यात चीन, सिंगापूर, ब्रुनेई, मेक्सिको, मंगोलिया, फ्रान्स अशा अनेक देशांचा समावेश आहे. प्रत्येक देशाने दिलेल्या या भेटवस्तूंमध्ये विविधता असून त्यात दारू, तलवारी, दागिने, मसाले, पितळ्याच्या मूर्ती, माशांची अंडी, सोने अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

परदेशी सरकारांकडून मिळालेल्या अशा भेटवस्तू विदेश मंत्रालयाकडे जमा केल्या जातात व त्यांची वेळोवेळी यादी जाहीर केली जाते असेही सांगण्यात आले आहे.