विधान परिषदेच्या एका जागेच्या निमित्ताने मुंडे विरुध्द मुंडे अशी लढत झाली. अनेक नेते या घरातल्या भांडणाकडे मोठ्या मजेने पहात आहेत पण त्यांनी आनंद घ्यावा असे तिच्यात काही नाही कारण असा झगडा कोणाच्याही घरात केव्हाही उभा राहू शकतो. या गंमत बघणार्यांत नाही समंजस लोक आहेत आणि त्यांना या घटनेने सावध केले आहे. कारण आज आपला पुतण्या आपला वाटला तरी उद्या चालून त्याच्या महत्त्वाकांक्षा वाढणारच नाहीत आणि तो आपल्या विरोधात बखेडा उभा करणारच नाही अशी काही खात्री देता येत नाही. त्या अर्थानेही या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या आता ते राज्याच्या राजकारणात स्थिर होत आहेत. याही लढतीत ते बाजी मारतील की काय असे वाटायला लागले होते. पण तसे झाले नाही. त्यांचे पुतणे धनंजय यांनी त्यांना चांगलाच धक्का दिला आणि अजित पवार यांच्या कृपेने विधानपरिषदेत पुन्हा प्रवेश मिळवला. धनंजय मुंडे यांचा विजय अपेक्षित होता कारण ही विधानपरिषदेची निवडणूक होती आणि तिचे मतदान ठरलेले असते. पण तरीही पुतण्याने काकांना धक्का दिला असे मानले जात आहे कारण काकांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. शड्डू ठोकले होते.
मुंडे विरुद्ध मुंडे
तसे ते आमदार फोडण्यात वाकबगार असल्यामुळे ते कदाचित काही आमदारांना फोडून पुतण्याला आसमान दाखवतील अशी शक्यता वाटायला लागली होती. या लढतीला वैयक्तिक रूप आले होते. तसे ते आले नसते तर या लढतीकडे कोणी लक्षही दिले नसते. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांना आघाडीचे उमेदवार म्हणून कॉंग्रेसचाही पाठिंबा होता. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीने पाठिंबा दिला होता. तेव्हा ही लढाई मुंडे विरुध्द मुंडे अशी होण्याचे काही कारण नव्हते. परंतु घरच्या मैदानात या पुतण्याने काकांना जेरीस आणले असल्यामुळे त्यांचे आमदार होणे काकांना परवडणारे नाही. त्यामुळे जमेल तिथे धनंजय मुंडे यांना खच्ची करायचे हे गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी आवश्यक आणि अपरिहार्य ठरले आहे आणि त्यामुळेच ही लढत गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिष्ठेची केली होती. वास्तवात त्यांनी ती कितीही प्रतिष्ठेची केली तरी विधानसभेतले संख्याबळ गोपीनाथ मुंडे यांच्या बाजूने नव्हते. पार्टी लाईनवर मतदान झाले तर धनंजय मुंडे यांना १७९ मते पडायला हवी होती आणि पृथ्वीराज काकडे यांना ९८ मते पडण्याची अपेक्षा होती.
दोघांच्या मतातले एवढे मोठे अंतर तोडून धनंजय मुंडे यांना पराभूत करणे हे तसे कठीणच काम होते परंतु गोपीनाथ मुंडे काहीतरी चमत्कार घडवणार कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचाच नाही तर त्यांच्या अस्तित्वाचा विषय आहे असे मानले जात होते. गोपीनाथ मुंडे यांनीसुध्दा ही गोष्ट लपवली नव्हती. तसे धनंजय मुंडे यांचा पराभव होणे हे विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना सत्ताधारी आघाडीला परवडणारे नव्हते. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कसून कामाला लागले होते. गोपीनाथ मुंडे यांचे काही आडाखे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेली आपापसातली कटुता आपल्या पथ्यावर पडेल असा त्यांचा कयास होता. परंतु त्यांची गणिते चुकली आणि काकांना धडा शिकवत धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत पुन्हा एकदा प्रवेश केला. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी एवढी अटीतटीची लढत होण्याची अलीकडच्या काळातली पहिलीच वेळ असावी. मात्र त्यात गोपीनाथ मुंडे यांची गणिते धुळीला मिळवत सत्ताधारी आघाडीने बाजी मारली. आघाडीत फार मोठी फूट पाडणे गोपीनाथ मुंडे यांना आता तरी शक्य झाले नाही पण म्हणायला आघाडीच्या ९ आमदारांनी अपेक्षेपेक्षा वेगळे मतदान केले. हा गोपीनाथ मुंडे यांचाच विजय मानला जात आहे.
या फाटाफुटीचा गोपीनाथ मुंडे यांना फारसा फायदा झाला नाही ही गोष्ट खरी आहे परंतु एवढी तरी मते का फुटावीत याचा विचार सत्ताधारी आघाडीने करण्याची गरज आहे. भाजपा सेना युतीच्या सत्तेच्या स्वप्नाला मनसेचा मोठा आधार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भाजपा-सेना-आरपीआय यांच्या महायुतीत आला तर आपण सत्तेत आल्यात जमा आहे असा विश्वास या युतीच्या नेत्यांना वाटत आहे. परंतु मनसेने त्यांना टाळी दिलेली नाही. त्यांचे बारा आमदार या मतदानापासून दूर राहिले आहेत. याचवेळी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असून त्याही निवडणुकीत मनसेने १२ जागा जिंकून भाजपा-सेनेच्या गणिताला छेद दिला आहे. मनसेने कायमच किंगमेकरची भूमिका बजावणारा छोटा पक्ष राहायचे ठरवले आहे. त्यांना त्यातच आनंद आहे. या लढतीच्या निमित्ताने काका आणि पुतण्या यांच्यातली भाऊबंदकी कोणत्या टोकाला जाऊ शकते हे दिसून आले आहे. गोपीनाथ मुंडे यांना ही पुतणेगिरी फार महागात पडली आहे. पण राजकारणात आता आता असे गृह कलह ठिकठिकाणी साकार होताना दिसत आहेत. तामिळनाडूपासून नवी दिल्ली पर्यंत अनेक घराण्यांतले वारस राजकारणात प्रस्थापित होण्याचा प्रयास करीत आहेत आणि त्यातून राजकारण रंगायला लागले आहे.