रामूने केला नीतू चंद्राचा पोपट

– बॉलीवूडचा प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा कधी काय करेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यावेळी नीतू चंद्रा त्याची शिकार ठरली असून त्याने तिचा असा पोपट केला की, बिचारीचा चांगलाच हिरमोड झाला. त्याचे झाले असे की, रामूने मार्शल आर्टमधील आख्यायिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रूस लीवर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच्या कथेत ब्रूस ली नायक नाही तर नायिका असेल. या भूमिकेसाठी मार्शल आर्टचे ज्ञान असलेली अभिनेत्री त्याला हवी आहे.

नीतू तायक्वांडोत तरबेज असून तिच्याकडे ब्लॅक बेल्ट असल्याचे सगळ्य़ांनाच माहीत आहे. त्यामुळे रामूने काही दिवसांपूर्वी तिला बोलावून घेत तासभर आपल्या चित्रपटासंबंधी चर्चा केली. चित्रपटाची सगळी कथा तिच्यापुढे मांडत नायिकेकडून आपल्याला काय हवे आहे व अँक्शन दृश्ये कशी हवीत, हेही तिला समजावून सांगितले. रामूचे सगळे बोलणे नीतू बारकाईने ऐकत होती. याआधी तिने त्याच्यासोबत रणमध्ये काम केलेले असल्याने त्याच्या या चित्रपटातही आपल्याला संधी मिळण्यास काहीच अडचण येणार नाही, असे तिला वाटत होते.

ही चर्चा सुरू असताना नीतू वेगळ्य़ाच स्वप्नांत हरवलेली होती. मात्र बोलणे संपल्यावर रामूने असा काही बॉम्बगोळा टाकला की, नीतूच्या पायाखालची जमीनच हादरली. रामूने चित्रपटाचे काही फुटेज व सोबत एका मुलीचे छायाचित्र नीतूला दाखवत ही आपल्या चित्रपटाची नायिका असून तू तिला तायक्वांडोतील डावपेच शिकव, अशी विनंती केली. हे ऐकल्यावर नीतू खाडकन भानावर आली. रामू आपल्यालाच चित्रपटाची ऑफर देत आहे या अपेक्षेत ती होती, पण नंतर जे कळले त्यामुळे तिला चांगलाच झटका बसला. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवत या भूमिकेसाठी ही मुलगी योग्य नसून त्यासाठी दणकट मुलगा हवा, असा अभिप्राय दिला. नीतूचा हा सल्ला रामू मानतो की नाही, हे समजेलच, पण पुढच्या वेळी तो नीतूला ऑफिसात बोलावेल तेव्हा ती आपली स्वप्ने घरीच ठेवून येईल, एवढेच मात्र नक्की.

Leave a Comment