पुणे – पुणे पोलिसांनी मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना पकडण्यात सर्वसामान्य नागरिकांचीही मदत व्हावी या उद्देशाने नऊ मोस्ट वॉटेड दहशतवाद्यांचे फोटो आणि त्यांची माहिती असलेले अनोखे कॅलेडर तयार केले असून ते सर्वसामान्य नागरिकांतही वाटले जाणार आहे. या कॅलेंडरमध्ये संबंधित दहशतवाद्यांचे रंगीत फोटो अतिशय स्पष्टपणे छापले गेले असल्याने कुणीही जागरूक नागरिक त्यांना सहज ओळखू शकेल अशी पोलिसांची अपेक्षा आहे.
पुणे जर्मन बेकरी व मुंबईतील अनेक स्फोटांत हवा असलेला कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अशा प्रकारच्या घटनात सामील असलेले अनेक दहशतवादी अद्यापीही मोकाट फिरत आहेत. पोलिस गेली अनेक वर्षे या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत मात्र ते अद्यापी हाती लागलेले नाहीत. पुणे पोलिसांच्या या कॅलेंडरमध्ये देश व पुण्याशी संबंधित दहशतवाद्यांची माहिती आहे. हे कॅलेंडर पॉकेट साईजमध्येही उपलब्ध केले जात असून ते सहजरित्या फोल्डही करता येते असे समजते.
कॅलेंडरच्या पहिल्या पानावर पोलिसांचा संदेश छापला गेला आहे. त्यात कोणत्याही दहशतवाद्याला पाहिले तर पोलिसांशी त्वरीत संफ साधण्याचे आवाहन केले गेले आहे व संपर्कासाठीचे फोन नंबरही दिले गेले आहेत. माहिती देणार्याेचे नांव गुप्त राखले जाईल असाही दिलासा दिला गेला आहे. कॅलेंडर मराठी भाषेत असून पहिला फोटा यासीन भटकळ याचाच आहे. नंतर मालेगांव स्फोटातील सारंग अकोलकर तसेच इंडियन मुजाहिद्नीने संघटनेचे अतूर रेहमान शेख, रिजवान डावरे, तहसीन अख्तर वसीम, असहुल्लाह अख्तर शेख, इस्माईल चौधरी, सोहेल गनी शेख व वकार उर्फ अहमद यांचे फोटो आहेत