धनंजय मुंडे यांची बाजी

मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला असून त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मुंडे यांना एकूण 165 मते मिळाली. तर काकडे यांना 106 मते मिळाली. या निवडणुकीत पुतण्याने काकांवर मात केली असली तरी आघाडीची 9 मते फोडून काका गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे.

विधानपरिषदेतील भाजपचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या रिक्त जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विधानसभेच्या एकूण 289 सदस्यांपैकी 273 सदस्यांनी मतदान केले. मनसेचे 12 आमदार या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने यापूर्वीच जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचे आमदार विधानभवनात फिरकलेच नाहीत. शेकापचे धैर्यशील पाटील, काँग्रेसचे अमित देशमुख, आणि सीपीआयचे राजाराम ओझरे हे तीन आमदार गैरहजर होते. तुरुंगात असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना मतदानात भाग घेता आला नाही. तर दोन मते बाद ठरली.

विधानसभेतील आघाडीचे एकूण संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे त्यांना 165 मते मिळाली असली तरी आघाडीची 9 मते फोडण्यात विरोधक यशस्वी झाले. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना 106 मते मिळाली. त्यात शिवसेना-भाजप युतीची 91, अपक्ष 3, शेकापचे 3 अशी एकूण 97 मते होती. शिवाय आघाडीची 9 मतेही काकडे यांनाच मिळाली असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. आपल्या पुतण्याच्या पराभवासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी कंबर कसली होती. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. असे असले तरी त्यांनी आघाडीची मते फोडून राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे धक्काच दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शेवटच्या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावेपर्यंत ते निवडणूकस्थळी हजर होते.