सत्याग्रह

बॉलिवुडमध्ये संवेदनशिल विषयावर व्यावसायीक चित्रपट बनविणारे दिग्दर्शक अशी प्रकाश झा यांची ख्याती आहे. त्यांचा बहुचर्चित ‘सत्याग्रह’ भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. अर्थात या चित्रपटाचे कथाकन अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकासाठी झालेल्या आंदोलनाशी निगडीत आहे.

‘सत्याग्रह’ भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्‍यांची कथा आहे. सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक द्वारका आनंद (अमिताभ बच्चन) यांना आपल्या देशाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवायच आहे. त्यांनी स्वत:चं संपूर्ण जीवन आपल्या सिद्धांतावर व्यतीत केले आहे. यामुळेच त्यंचा मुलगाही उच्च शिक्षण घेऊन परदेशात, खासगी क्षेत्रात लाखो रूपयांच्या पगाराची ऑफर असतानाही त्याऐवजी सरकारी नोकरी करून जनसेवा करण्याचा निर्णय घेतो. एके दिवशी अचानक एका दुर्घटनेत द्वारका यांच्या मुलाचा – अखिलेशचा मृत्यू होतो.

अखिलेशचा मित्र मानव राघवेंद्र (अजय देवगन) दिल्ली मध्ये आपला व्यापार चालवत असतो.. तोही भ्रष्टाचाराविरुद्ध कोणतीही संकटं झेलण्यासाठी तयार आहे. मात्र, मंत्री बलराम सिंहला (मनोज वाजपेयी) केवळ सत्तेतच रस आहे. राजवंशी सिंह (अर्जुन रामपाल) गल्लीबोळांतल्याच राजकारणात अडकून पडलाय. यास्मीन (करीना कपूर खान) एक महिला शोध पत्रकाराच्या भूमिकेत दिसते. लोकांपर्यंत सत्य उघड करणं ती स्वत:च कर्तव्य समजते. मंत्री बलराम अखिलेशच्या पत्नीला नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतो. परंतु, घोषणेनंतर तीन महिन्यानंतरही तिला ही नुकसान भरपाई मिळत नाही तेव्हा ती कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल होते आणि इथूनच सुरू होते

भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई…
संवेदनशील सामाजिक विषयांची हाताळणी करणारे बॉलिवुदमध्ये अनेक दिग्दर्शक आहेत. त्यात सर्वाधिक महत्वाचे नाव प्रकश झा यांचे आहे कारण त्यांचे चित्रपट सामाजिक आशयाबरोबरच प्रबोधन करतात या शिवाय सामान्य प्रेक्षकाला हवे अस्लेले मनोरंजनही देतात. चित्रपटाच्या आशयाची मांडणी करताना पटकथा लेखकाने भष्ट्राचार हा मुद्द हाताळताना कुठेही अतिरेकीपणा वाटणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळेच कथा अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी साधर्म्य साधणारी असली तरी प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण वाटते.

चित्रपटामध्ये अण्णांचं आंदोलन, लोकपाल बिल, अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाचा उदय, इंजिनिअर सत्येंद्र दुबे हत्या प्रकरण अशा काही सत्य घटनाचं प्रतिबिंब दिसतं. या सर्व घटना आपल्याला माहीत असल्या तरी त्या कथारूपात मांडताना त्यांना नाटकीय रूप न देता वास्तववादी विचार करून मांडण्यत आले आहे. यामुळेच अजय देवगनचे मतपरिवर्तन, मानव आणि यास्मिन मधले मतभेद या घटना प्रेक्षक स्वीकारतो.
महानायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमिताभ बच्चन यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतलाय. अमिताभ बच्चन यांची भूमिका चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांच्या डोक्यात फिरत राहते. त्यांची भूमिका अण्णा हजारेंप्रमाणे आहे असे प्रदर्शनपूर्व चित्र रंगवण्यात आले होते मात्र ती भूमिका अण्णांपेक्षा गांधीजींच्या अधिक जवळ जाणारी ठरली आहे. प्रकाश झा आणि अजय देवगन यांची केमेस्स्ट्री गंगाजल पासून जुळून आलेली अहे ती परंपरा इथेही कायम आहे. मनोज वाजपेयीनंही भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिलाय. करीना कपूरची पत्रकार ही लक्षात राहणारी आहे. अर्जुन रामपाल राजनीती नंतर पुन्हा एकदा उत्तम अभिनयाचे दर्शन घडवतो. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच चित्रपटटालचे पार्श्‍वीसंगीत प्रभावी झाले आहे. आयटम नंबर, प्रेम कहाणी टाळली असती तर चित्रपट अधिक प्रभाववी झाला असता यात शंका नाही.

चित्रपट – सत्याग्रह
निर्मीती -प्रकाश झा, रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक – प्रकाश झा
संगीत-सलीम-सुलेमान, आदेश श्रीवास्तव, ओशन मीट ब्रदर्स
कलाकार – अमिताभ बच्चन, अजय देवगण, करीना कपूर, मनोज बाजपेयी, अर्जुन रामपाल, अमृता राव.

रेटिंग – * * *

 

Leave a Comment