नवी दिल्ली – दिल्लीतल्या एका सत्र न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. २००८ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते विजेंद्र गुप्ता आणि माहितीच्या अधिकारात काम करणारे कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी दाखल केलेल्या फिर्यादीचा निकाल देताना विशेष न्यायाधीश नरोत्तम कौशल यांनी हा आदेश दिला. या दोघांनीही आपल्या अर्जामध्ये शीला दीक्षित यांच्यावर निवडणूक प्रचार मोहिमेच्या खर्चामध्ये २२ कोटी ८० लाखाचा अपहार केल्याचा आरोप लावला आहे.
असा आरोप लावण्यात आला असला तरी राज्य सरकारच्या प्रवक्त्याने हा आरोप फेटाळून लावला आहे. या संबंधात शीला दीक्षित यांची लोकायुक्तांकडून चौकशी झाली आहे आणि लोकायुक्तांनी शीला दीक्षित यांच्यावर लावण्यात आलेले हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. विजेंद्र गुप्ता आणि विवेक गर्ग या दोघांनीही राज्य सरकारचा हा खुलासा बनावट असल्याचे म्हटले आहे.