आशिया चषकात भारताला हॅटट्रिकची संधी

इपोह – नवव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी भारताची लढत गतविजेत्या दक्षिण कोरियाशी होणार आहे. २००३ आणि २००७ अशी सलग दोनदा भारताने बाजी मारली होती. या सामन्या त विजय मिळवून सरदार सिंग आणि सहका-यांना सहा वर्षानंतर पुन्हा एकदा हॅटट्रिकची संधी चालून आली आहे.

आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे सात वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. सलग चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर २००३ आणि २००७ अशी सलग दोनदा भारताने बाजी मारली. गेल्याा खेपेस गतविजेत्यांचे आव्हान साखळीत संपुष्टात आले. यावेळी मात्र भारताने कंबर कसली आहे. अंतिम फेरीपर्यंत अजिंक्य असलेला भारत एकमेव संघ आहे. गतविजेता दक्षिण कोरिया जेतेपद राखण्यासाठी उत्सुक असला तरी साखळीत हरवल्यामुळे सरदार सिंग आणि कंपनीचा आत्मविश्वास उंचावला आहे.

नवव्या आशिया चषकाचा विचार केल्यास अंतिम फेरीत भारताचे पारडे जड वाटते. चार सामन्यांत भारताने २१ गोल केलेत. तसेच केवळ एकच गोल खाल्ला आहे. बचावफळी भारतासाठी चिंतेची बाब ठरली होती. मात्र व्ही. आर. रघुनाथ, रूपिंदर पाल सिंग, कोठाजित सिंग, गुरमेल सिंग आणि बिमेंद्र लाक्राने बहारदार कामगिरी केल्याने बचावफळीचा विजयात मोलाचा वाटा राहिला आहे. उपकर्णधार आणि गोलकीपर पी. आर. श्रीजेशचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मनदीपने सर्वाधिक पाच गोल करत स्पर्धेत अव्वल स्थान राखले आहे.
दक्षिण कोरिया जेतेपदासह साखळीतील पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक आहे. जँग जोंग हय़ुन आणि हय़ुन ये संगवर त्यांची सर्वाधिक भिस्त आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ‘सुपर संडे’ला एक चुरशीची लढत अपेक्षित आहे.