अलाहाबाद – त्रिवेणी संगमाचे शहर

हिंदू धर्मियांच्या धर्मग्रंथात ब्रह्माने जेथे प्राकृष्ठ यज्ञ केला ते ठिकाण म्हणजेच प्रयाग किंवा आताचे अलाहाबाद हे शहर. त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना आणि गुप्त रूपातील सरस्वती यांचा संगम येथेच झाला आहे आणि त्यामुळे ते पवित्र तीर्थस्थळ आहे. वेदात या शहराचे उल्लेख आहेत तसेच रामायण महाभारतातही आहेत. वर्षभर सतत कोणत्या ना कोणत्या तरी यात्रा येथे सुरू असतात. हजारो पर्यटक वर्षभर या स्थळाला भेट देत असतात. वर्षातून होणारा माघमेळा आणि बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा ही साधूसंतांसाठी जशी मोठी पर्वणी असते तशीच भाविकांसाठीही असते.
allahabad
मुघल सम्राटांसाठी प्रयाग हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. सम्राट अकबराने या शहराचे नांव १५७५ साली इलाहाबाद असे केले. इलाहाबाद याचा अर्थ महत्त्वाचे ठाणे. त्याने येथे सुंदर किल्लाही बांधला. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात या शहराने फार महत्त्वाची भूमिका बजावली. हे शहर महत्त्वाचे राष्ट्रीय स्थानच बनले होते. अनेक विचारवंत, कवी, नेते, लेखक या शहरात वास्तव्यास होते. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान याच शहरात होते आज तेथे संग्रहालय आहे. ब्रिटीश काळातही या शहराचे लष्करीदृष्ट्या असलेले महत्त्व कायम होते.
allahabad1
विसाव्या शतकाच्या सुरवातीला स्थापन झालेले अलाहाबाद विद्यापीठ हे महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आणि आजही त्याचे ते महत्त्व कायम आहे. अलाहाबाद फोर्ट आणि दोन नद्यांच्या किनार्यातवरचा झनाना पॅलेस पाहण्यासारखा. याच ठीकाणी अक्षय वटवृक्ष आहे. हिंदू धर्मियांनी पवित्र मानलेला हा वृक्ष मुघल सम्राटांनी अनेकवेळा तोडला. त्याची नामोनिशाणी मिटावी यासाठी जेथे हा वृक्ष होता तेथे दगडी फरसबंदी करण्यात आली. मात्र तरीही पुन्हा त्याच जागी हा वटवृक्ष आला आणि आजही तो त्याच जागी आहे.
allahabad2
देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेला अमृतकुंभ आणि तो नेत असताना चार ठिकाणी पडलेले अमृताचे चार थेंब जेथे जेथे पडले तेथे तेथे कुंभमेळा भरविला जातो. हरद्वार, नाशिक, प्रयाग म्हणजेच अलाहाबाद आणि उज्जैन या ठिकाणी हे थेंब पडले असा समज आहे. दसर्या च्या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर रामलिला साजरी होते आणि रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पर्यटक आवर्जून येतात. त्याचबरोबर या काळात दुर्गापूजेचा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी वेणीदान करण्याची प्रथा आहे. म्हणजे सुवासिनी आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी नावेने जाऊन आपल्या वेणीची बट तेथे कापतात आणि ती प्रवाहात विसर्जित केली जाते. वेणी घालताना तीन पेड असतात पण प्रत्यक्षात वेणी दुपेडी दिसते. येथेही तीन नद्यांचा संगम असला तरी सरस्वती गुप्त असल्याने दोन नद्यांचाच संगम प्रत्यक्षात दिसतो.
allahabad3
जनाना पॅलेसच्या प्रवेश जागेजवळ असलेला ३५ फूट उंचीचा अशोक स्तंभ, शहाजहानचा मोठा भाऊ खुस्त्रो याने बांधलेली बाग, नेहरू जेथे राहात असत ते आनंदभवन, स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय जेथे घेतले गेले ते स्वराजभवन, प्लॅनेटोरियम, संग्रहालय ही अन्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत येथे मिळणारे पेरू आवर्जून खावेत अशा अवीट चवीचे असतात. त्याचबरोबर रसगुल्ले, मुघलाई पद्धतीचे पदार्थ, समोसे, लस्सी, रबडी आणि अनेक प्रकारची बर्फी लाजवाब. इतक्या खादडीनंतर अलाहाबादी पान खायलाच हवे हेही ध्यानात ठेवावे.

अलाहाबाद येथे जाण्यासाठी रस्तामार्ग तसेच रेल्वे सोयीच्या आहेत. मुंबईहून एकच विमानही जाते. अन्यथा दिल्लीमार्गे अथवा कलकत्याहूनही जाणे सोयीचे आहे.

Leave a Comment