मातंग समाजाच्या आरक्षणास विरोध नाही :रामदास आठवले

पुणे, – मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणास विरोध नाही. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच्या वतीने मातंग समाज अत्याचार विरोधी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, ज्येष्ठ नेते एम.डी.शेवाळे, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, हनुमंत साठे आदी यावेळी उपस्थित होते.

अनुचित जातींना 13 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा बौध्द धर्मियांना होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मातंग समाजातील लोक स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहेत. मातंग समाज हा दलितांमधील अविभाज्य घटक आहे. मातंग समाजाला वेगळे आरक्षण हवे असल्यास त्याच आमचा पाठिंबा आहे. सरकारने यासंबंधी आराखडा तयार करावा. अशी मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे.

अलीकडच्या काळात दलितांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मातंग समाजावर होणारे अन्यायही वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मातंग समाजामध्ये जागृती करण्यासाठी मातंग समाज अत्याचार विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 6 ऑक्टोबर रोजी नाना पेठ येथील अहिल्या आश्रम येथे घेण्यासंबंधीचा निर्णयही या बैठकीत झाला आहे, असेही आठवले सांगितले. रिपब्लिकन येत्या निवडणुकीत मातंग समाजाला तिकीटे देणार का, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, रिपब्लिकन पक्ष अर्धी तिकीटे दलित नसलेल्यांना देणार आहे. त्यानंतर निम्मी तिकीटे दलितांना देण्यात येणार आहेत. यामध्ये मातंग समाजाचाही विचार केला जाणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.