पाटणा – गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेला कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ आजपर्यंत पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला असला तरी शेवटी रमजान ईदच्या निमित्ताने पत्नीला पाठवलेल्या १ लाख रुपयामुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गेल्या सहा महिन्यापासून तो नेपाळमध्ये तो वास्तव्यास होता. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात राहणार्या आपल्या पत्नीला त्याने रमजान ईदच्या खर्चासाठी म्हणून बँकेतून १ लाख रुपये पाठवले. ते पैसे पाठवण्याचा मार्ग आणि त्या पैशाचा उगम यांचा मागोवा घेऊन पोलिसांनी यासीनच्या हातात हातकड्या ठोकल्या.
लाखाची ईदी यासीनला महागात पडली
काल त्याला अटक केल्यापासून त्याने मधुबनीच्या पोलिसांसमोर तोंड उघडायला सुरूवात केली आहे. त्याचे खरे नाव मोहम्मद अहमद झरार सिध्दीबाबा असे असून तो दहशतवादी संघटनांमध्ये शाहरूख या नावाने ओळखला जात होता. पोलिसांनी मात्र त्याला यासीन भटकळ असे नाव दिले होते. यासीन भटकळ २००४ मध्ये दुबईला गेला. तिथे त्याने क्रीडा साहित्य विकणार्या दुकानात नोकरी केली आणि तिथून काही दिवसांनी तो कराचीला पोहोचला.
यानंतर काही दिवस अमेरिकेत काढून भारतात परतला. त्याने इंडियन मुजाहिदीन या संघटनेला दिल्ली आणि अहमदाबादेतील स्फोटांसाठी स्फोटके पुरविली अशी माहिती त्याने स्वतःच दिली आहे. त्याला काल मधुबनीच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले तेव्हा १२ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस त्याच्या लॅपटॉपचा शोध घेत आहेत आणि त्याच्या आधारावर त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत याचा शोध घेत आहेत.
