भारतीय हॉकी संघाचा वर्ल्डकप प्रवेश निश्चित

इपोह – पुढील वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील प्रवेश भारतीय संघाने जवळपास निश्चित केला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत यजमान मलेशियावर २-० असा विजय मिळवला आहे. नवव्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या दक्षिण कोरियाने दुस-या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला २ – १ असे हरवल्याने भारतासह मलेशियाचे वर्ल्डकप तिकीटही पक्के मानले जात आहे. दक्षिण कोरियाने याआधीच आपला वर्ल्डकप प्रवेश निश्चित केला आहे.

सुलतान अझलन शाह स्टेडियमवरील या दोन्ही उपांत्य लढती हॉलंडमध्ये होणा-या आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय देऊन गेल्या .
नोव्हेंबरमध्ये ओशियाना कप स्पर्धा आटोपली की भारत , मलेशिया यांच्या वर्ल्डकप भवितव्याविषयी निश्चित माहिती मिळेल. पराभवामुळे पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील समावेश मात्र हुकला आहे. बार्सेलोनामध्ये प्रथमच १९७१ मध्ये वर्ल्डकपला सुरुवात झाली. त्यानंतर प्रथमच पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होऊ शकलेला नाही .

जागतिक रँकिंगमध्ये भारत ११व्या, तर मलेशिया १३व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा फॉर्म बघता त्यांनाच या लढतीसाठी फेव्हरिट समजले जात होते. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मलेशियाचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सामन्याच्या आठव्याच मिनिटाला रघुनाथने भारतीय संघाचे खाते उघडले. पेनल्टी कॉर्नर सत्करणी लावत त्याने स्पर्धेतील आपला सातवा गोल नोंदवला. सुरुवातीला मलेशियाला गोल करण्याच्या संधी मिळाल्या. मात्र , या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. त्यामुळे पूर्वाधात भारत १ – ०ने आघाडीवर होता.

यानंतर उत्तरार्धातही मलेशियाला पुन्हा गोल करण्याच्या संधी मिळाल्या. मात्र , गोलरक्षक पी . आर. श्रीजेशला चकविण्यात मलेशियाचे खेळाडू अपयशी ठरले. मलेशियाच्या खेळाडूंना सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र , श्रीजेशने त्यांना यश मिळू दिले नाही. भारताला उत्तरार्धानंतर चारच मिनिटांनी गोल करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र , मलेशियाचा गोलरक्षक कुमार सुब्रह्मण्यम याने रुपिंदरपाल सिंगचा पेनल्टी कॉर्नरवरील गोल अडवला. मनदीपसिंगने ६०व्या मिनिटाला रमनदीपसिंगच्या पासवर गोल करून भारताला २ – ० अशी आघाडी मिळवून दिली .