झोपेच्या अभावाने २० टक्के लोक त्रस्त

sleep
लंडन – ब्रिटनमधील २० टक्के जनता पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त झाली असल्याचे एका पाहणीतून आढळले आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला किमान साडे सहा ते आठ तास शांत झोप मिळालीच पाहिजे. तेवढी झोप न मिळाल्यास त्याच्या कामावर परिणाम होतो आणि त्याचे आरोग्यही बिघडते. झोप पुरेशी न झालेले लोक नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळे ब्रिटनमध्ये एका वर्षात ६० लाख मनुष्यतास वाया जातात असे डेली एक्स्प्रेस या वृत्तपत्राने म्हटले आहे.

झोप कमी होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सुध्दा एक सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा असे आढळले की पुरेशी आणि शांत झोप न मिळण्यामागे अनेक अनपेक्षित कारणे आहेत. सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की केवळ १३ टक्के लोकच निवांत आणि शांत झोप मिळवू शकतात. ८७ टक्के लोकांना कमी जास्त प्रमाणात का होईना पण झोपेचा अभाव जाणवतो आणि ते जेवढा वेळ झोपतात तेवढी झोपसुध्दा शांतपणे लागत नाही.

झोप शांत न लागणार्‍या लोकांमध्ये पैशाच्या चिंतेेमुळे झोप उडालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय निरनिराळ्या प्रकारचे तणाव हेही झोप न लागण्याचे कारण आहे. मात्र एक आगळेवेगळे कारण समोर आले आहे. आपल्याला पहाटे लवकर जाग येईल की नाही या चिंतेमुळे सुध्दा अनेकांना शांत झोप लागत नाही हे ते कारण होय.

१९ टक्के लोकांनी पती-पत्नीमधील भांडण आणि वाद हे झोप खराब करण्याचे कारण सांगितले आहे. झोप कमी मिळून अस्वस्थता आल्यामुळे काही लोक कामावर जात नाहीत अशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. १७ टक्के लोक कामावर निघेपर्यंत आणि बसमध्ये बसेपर्यंतसुध्दा अर्धवट झोपेमध्ये असतात. ७ टक्के लोक काम करताना डुलक्या घेतात तर ४ टक्के लोक मिटिंग सुरू असताना झोपत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment