पोलिसांच्या बेपर्वाईमुळेच अत्याचार

सामूहिक बलात्कारासारख्या घटना घडल्या की समाजात प्रक्षोभ निर्माण होतो. शेवटी अशा घटनांचा संबंध पोलिसांशी असल्यामुळे लोकांचा राग पोलिसांवरच व्यक्त होतो. पोलिसांची सूत्रे गृहखात्याच्या हातात असतात. त्यामुळे पर्यायाने लोक गृहखात्यावरही नाराज होतात. पण गृहखात्याचे मंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा प्रकारे दोषारोप आपल्या अंगाला लागू देत नाहीत. सामाजिक परिस्थितीच बदललेली आहे, सर्वांना संरक्षण देणे कसे शक्य आहे असे बहाणे सांगून ही जबाबदार मंडळी आपली जबाबदारी झटकून टाकतात. परंतु मुंबईतल्या पत्रकार महिलेवर झालेल्या बलात्काराच्या निमित्ताने समोर येत असलेली माहिती अशा घटनांना पोलिसांची ढिलाईच जबाबदार असल्याचे दाखवून देत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलीस ठाण्याच्या आणि चौकीच्या परिसरात घडणार्‍या छोट्या मोठ्या गोष्टींवर आणि रिकामटेकड्या लोकांवर पोलिसांची नजर राहिलेली नाही. हे या प्रकरणात पुरतेपणी स्पष्ट झाले आहे. मुंबईतली बलात्काराची घटना ज्या कापड गिरणीच्या मोकळ्या मैदानावरील निर्जन ठिकाणी घडली त्या ठिकाणी हे आरोपी असलेले तरुण नेहमी पत्ते खेळत बसलेले असत.

त्या परिसरात येणार्‍या एकाकी महिलांवर बलात्कार करणे हा त्यांचा उद्योगच झालेला होता. त्यांनी या पत्रकार महिलेवर बलात्कार करण्यापूर्वी असे तीन प्रकार केले होते. मात्र आपल्या दुर्दैवाने साधारणतः बलात्कार होणार्‍या महिला तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे हे प्रकार खपून गेले. या नराधम तरुणांनी यापूर्वी या परिसरात आलेल्या जोडप्यावर असाच प्रयोग केला होता. हे जोडपे एकांतासाठी तिथे आले होते आणि त्यातल्या नवर्‍या बांधून ठेवून चौघांनी त्या बाईवर अत्याचार केले आणि तिचे फोटो काढले. पोलिसांत तक्रार दिल्यास सर्वांना फोटो दाखवण्याची धमकी दिली. त्यामुळे हे जोडपे तक्रार करण्यास धजावले नाही. ही युक्ती एकदा पचून गेली त्यामुळे या चांडाळ चौकडीचे धारिष्ट वाढले आणि ते त्या गिरणीच्या एकाकी आवारात येणार्‍या बायकांवर लक्षच ठेवायला लागले. आपण बलात्कार केला आणि फोटो काढले की पोलिसापर्यंत प्रकरण जात नाही हे लक्षात आल्यावर तर त्यांना भलताच जोर चढला आणि त्यांनी कचरा वेचायला येणार्‍या तरुणीवर हाच प्रयोग केला. या परिसरात या चांडळ चौकडीच्या अधम उद्योगाची दबक्या आवाजात चर्चा होत होती.

विशेषतः कचरा वेचणार्‍या मुलीच्या संबंधात तर सर्वांनाच माहीत झाले होते. मात्र माहीत असलेल्या कोणीही याची कल्पना पोलिसांना दिली नाही. अशा घटना आणि चर्चा यांची खबर सर्वांना मिळते पण पोलिसांनाच ती मिळत नाही. हे पोलिसांचे अपयश आहे. पोलिसांचे कान आणि डोळे तीक्ष्ण असते तर ही चर्चा त्यांच्यापर्यंत गेली असती आणि त्यांनी या तरुणांवर लक्ष ठेवले असते तर कदाचित या महिला पत्रकारावर झालेला अत्याचार टळला असता. आपापल्या परिसरातील व्यसनी लोक आणि निरुद्योगी तरुण हेच अशा गुन्ह्यांचे मूळ असते. हे पोलिसांना कळत नाही असे नाही. परंतु आपल्यावर समाजाचे रक्षण करण्याची एक नैतिक जबाबदारी आहे. याचे भान पोलिसांना राहिलेले नाही. एवढेच नव्हे तर अशा घटना घडतात तेव्हा त्यावर पुढारी मंडळी ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात त्या प्रतिक्रिया सुध्दा या जबाबदारीची जाणीव व्यक्त करणार्‍या नसतात. असे प्रकार घडल्यानंतर व्यक्त झालेल्या मंत्र्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यातर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. विशेषतः आपले गृहमंत्री आर. आर. पाटील हे प्रतिक्रिया व्यक्त करताना, घडलेली घटना आपल्या खात्याच्या अकार्यक्षमतेकडे बोट दाखवणारी आहे हे प्रांजळपणाने कधीच कबूल करत नाहीत.

आजवरच्या अनेक प्रतिक्रिया पाहिल्यास असे लक्षात येते की आर. आर. पाटील हे प्रतिक्रिया देताना प्रतिक्रिया विचारणार्‍यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याऐवजी प्रश्‍नकर्त्यालाच प्रश्‍न करतात. समाज म्हटल्यावर अशा घटना घडणारच, ते अपरिहार्यच आहेत, गुन्हे कधीच पूर्णपणे संपत नसतात, ते घडणारच नाहीत याची काही शाश्‍वती देता येत नसते, आम्ही गुन्हा घडल्यानंतर कारवाई केली आहे की नाही ते बघा, गृहखाते गुन्हे घडणार नाहीत याची ग्वाही देऊ शकत नाही अशा प्रकारची उत्तरे ते देतात. अशी उत्तरे दिली म्हणजे पोलीस खात्याला कसलीच खंत वाटत नाही. मंत्रीच असे बोलल्यावर पोलीसही आपली जबाबदारी झटकतात. परंतु आर. आर. पाटील करत असलेले अशा प्रकारचे प्रतिपादन हे तर्कशुध्द नसते. पोलिसांनी सावधपणे लक्ष दिल्यास काही गुन्हे टळू शकतात हे निदान या बलात्काराच्या प्रकरणात तरी निश्‍चितपणे दिसून आलेले आहे. हा सारा प्रकार ताजा असतानाच जालना जिल्ह्यामध्ये एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केली. आता अशा प्रकरणात तरी पोलिसांनाच जबाबदार धरले पाहिजे. आर. आर. पाटील करतात तसे युक्तीवाद या प्रकरणाला तरी बिलकुल लागू होत नाहीत. कारण गावामध्ये आणि शहरांमध्ये टारगट मुले कुठे उभी राहून मुलींची टिंगलटवाळी करत असतात हे पोलिसांसह सर्वांना माहीत असते. अशा ठिकाणी कोल्हापूर लेडी सिंघम् प्रमाणे एखाद्या हवालदाराने जरी एखाद्या रोडरोमिओच्या मुस्काटात दिली तरी असे प्रकार थांबतात पण पोलीस काही करतच नाहीत आणि म्हणून हे सगळे प्रकार होत असतात.