पतीच्या चित्रपटातून काजोल करणार पुनरागमन

बॉलीवूडमध्ये आपला एक काळ गाजविणारी अभिनेत्री काजोल बर्‍याच दिवसांपासून पडद्यावर दिसली नाही. ३९ वर्षांची ही अभिनेत्री सामाजिक जीवनात ज्याप्रकारे सक्रिय आहे, ते पाहता एवढय़ा लवकर ती अभिनयाला रामराम करेल, असे कधीच वाटले नव्हते. बहुधा काजोलनेही आता असाच निर्णय घेतला आहे. आपल्या चाहत्यांची नाराजी टाळण्यासाठी ती लवकरच चित्रपटात दिसणार आहे.

फिल्मी सूत्रांच्या माहितीनुसार, पती अजय देवगनच्या बॅनरखाली बनणार्‍या चित्रपटातून काजोल बॉलीवूडमध्ये पतरणार आहे. त्यातील तिची भूमिका पाहुणी नसेल, तर मुख्य नायिकेची असेल. खरेतर काजोलही बर्‍याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर परतण्याचा विचार करत होती. मात्र आपली आवड व प्रतिमेला साजेसी कथा व भूमिका तिला हवी होती. आता अशी मनाजोगी भूमिका मिळाल्याने तिला ताबडतोब तिने होकार दिला.

सगळ्य़ात महत्त्वाचे म्हणजे आपले पुनरागमन व नवा चित्रपट याबाबत काहीच लपवून ठेवण्याची तिची इच्छा नाही. काही दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना काजोलने सांगितले की, या चित्रपटाची कथा आपल्याला अतिशय आवडली. या कथेवर बनत असलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी दवडण्याची माझी अजिबात इच्छा नाही. अर्थात या चित्रपटाबाबत जास्त सविस्तर बोलणे घाईचे ठरू शकते, असे सांगून काही गोष्टींवर चर्चा करण्यास तिने नकार दिला.

या चित्रपटाविषयी यथाअवकाश कळेलच, पण काजोलच्या चाहत्यांसाठी ती पुन्हा पडद्यावर परतत आहे, ही मोठी बातमी आहे आणि चित्रपटाच्या कथेबाबत जाणून घेण्याची त्यांचीसुद्धा इच्छा नाही. ‘वुई आर फॅमिली’ या चित्रपटानंतर काजोल एकदाही पडद्यावर दिसली नाही.

Leave a Comment