ग्रुह खात्याने उत्तम समन्वयाने काम केल्यास काय होऊ शकते याचा अनुभव येत आहे. सीबीआय आणि रॉ यांची मदत घेतल्यास मोठ्यात मोठ्या दहशतवाद्यालाही अटक करता येते. गेल्याच आठवड्यात अब्दुल करीम तुंडाला अटक करून दहशतवादी संघटनांना आव्हान दिले होते. आता अनेक बॉंबस्फोटांत वारंवार नाव येणार्या भटकळला अटक करण्यात आली आहे. यासीन भटकळ पोलिसांना हवा होता आणि त्याला पकडण्यासाठी १० लाखाचे बक्षिस लावण्यात आले होते. त्याला अटक झाल्याने दहशतवादाच्या जाळ्यातले काही बरेच धागे आता हाती लागतील अशी आशा वाटायला लागली आहे. कधी कधी मनात असा प्रश्न निर्माण होतो की, पाकिस्तानच्या मदतीने सुरू असलेल्या या दहशतवादी कारवायांचा कधी तरी शेवट होईल की नाही ? किती दिवस हे असे चालणार ? पंजाबातल्या अतिरेकी कारवायां बाबत असेच विचारले जात होते. पण तिथल्या अतिरेकी कारवाया एके दिवशी संपल्याच की नाही ? तसाच हा प्रकार आहे. तुंडा आणि भटकळ यांना अटक झाल्यामुळे दहशतवादी कारवायांच्या शेवटाची सुरूवात झाली आहे असे वाटायला लागले आहे. कारण हे दोघे दहशतवादी कारवायांत आघाडीवर होते.
गेल्याआठवड्यात तुंडाला अटक करण्यात आली होती.
दहशतवाद संपू शकेल
९७९ सालपासून तो भारत विरोधी अतिरेकी शक्तींसाठी काम करत होता. त्यामुळे या दहशतवादी संघटनांची खडान्खडा माहिती तुंडाकडे असणार असा पोलिसांचा कयास होता. अटक झाल्यानंतर पहिले काही तास विलक्षण गुर्मीत बोलणारा तुंडा पोलिसांचा हिसका बसताच बोलायला लागलेला दिसत आहे. म्हणूनच त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर काल यासीन भटकळ याला अटक करता आली आहे. त्याच्या सोबत त्याचा दुसरा सहकारी असादुल्ला यालाही अटक झाली आहे. गेल्या सात आठ वर्षांमध्ये भारतात झालेल्या सर्व महत्त्वाच्या बॉम्बस्फोटामध्ये यासीन भटकळ आरोपी होता. किंबहुना तो यातल्या बहुतेक स्फोटांच्या मागचा सूत्रधारच होता. मात्र त्याला कधी अटक झाली नाही. त्याने २००८ साली बंगळूर, अहमदाबाद, जयपूर आणि दिल्ली अशा भारतातल्या चार मोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून जवळपास २०० लोकांना ठार केले. त्यामुळे त्याने २०१० मध्ये पुण्यात चार आणि वाराणसीत एक स्फोट घडवला. या निमित्ताने अटक झालेल्या प्रत्येक संशयिताने कबुली जबाबामध्ये यासीन भटकळ हे नाव वारंवार घेतले. त्यामुळे यासीन भटकळला अटक होणे हासुरक्षा व्यवस्थांसाठी प्रतिष्ठेचा झाला.
तुंडा बोलायला लागला म्हणून यासीन भटकळ सापडला. आता यासीन भटकळ बोलायला लागला की भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे हात अन्य दोन भटकळ बंधूंपर्यंत आणि पर्यायाने दाऊद इब्राहिमपर्यंत पोचण्याची आशा आहे. यासीन भटकळला झालेली अटक ही नेमकी किती महत्त्वाची आहे हे त्याच्यावरच्या आरोपांवरून स्पष्ट होत आहेच परंतु त्याचे आडनाव भटकळ आहे यामुळे सुध्दा त्याच्या अटकेला एक वेगळे महत्त्व आहे. आजवरच्या दहशतवादी कारवायामध्ये सापडलेल्या संशयित गुन्हेगारांच्या जबाबामध्ये रियाज आणि इक्बाल भटकळ ही दोन नावेसुध्दा वारंवार आलेली आहेत. हे दोन बंधू पोलिसांना सापडणेसुध्दा फार महत्त्वाचे आहे. रियाज आणि इक्बाल भटकळ हे दोन सख्खे भाऊ आहेत. यासीन त्यांचा कोणी नाही. ते तिघेही कर्नाटकाच्या मंगळूर जिल्ह्यातील भटकळ गावचे राहणारे आहेत. खरे म्हणजे रियाझ आणि इक्बाल या दोन भावांचे आडनाव शहाबंद्री असे आहे आणि त्यांचे कुटुंब अजूनही भटकळमध्येच राहते.. २००५ साली इंजिनियर रियाज हा घरातून पळाला आणि त्याने दाऊद इब्राहिमशी संधान साधून दहशतवादी कारवाया मध्ये सहभागी होण्याचे ठरवले. त्याच्या पाठोपाठ २०१० साली त्याचा भाऊ डॉक्टर इक्बाल हाही पळाला. तो तर डॉक्टर होता. तर असे हे दोन बंधू आता पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमच्या आश्रयाने राहत आहेत.
दाऊदला पकडायचे असेल तर यासीनला पकडणे महत्त्वाचे नाही. या दोन बंधूंपर्यंत गेले तरच दाऊद सापडू शकेल. यासीन हा भटकळ गावचाच राहणारा आहे. म्हणून पोलिसांच्या नोंदीत त्याचे आडनाव भटकळ असे पडले आहे. २००७ सालीच त्याच्या कुटुंबियांनी ते गाव सोडले. त्यावर हे कुटुंब कोठे गेले हे भटकळ गावच्या लोकांना माहीतसुध्दा नाही. त्या कुटुंबातला यासीन हा मुलगा. रियाज आणि इक्बाल हे बंधू तसे इस्लामच्या आकर्षणापोटी दहशतवादी कारवायात गुंतले आहेत. तसा यासीन नाही. तो गुन्हेगारीच्या माध्यमातून अतिरेक्यांकडे आकृष्ट झाला आहे. त्याला एकदा भुरट्या चोराप्रमाणे पकडले होते. मात्र तो खोटे नाव सांगून पसार झाला. प्रत्यक्ष गुन्हा करण्यात हातखंडा असल्यामुळे इंडियन मुजाहिदीनच्या नेत्यांनी विविध ठिकाणी बॉम्ब पेरण्याचे काम यासीनवर सोपवले आणि त्यामुळे त्याचा भारतातल्या विविध बॉम्बस्फोटांशी संबंध आला. अब्दुल करिम तुंडा हा बॉम्ब बनवणारा आणि यासीन भटकळ हा बॉम्ब पेरणारा अशी ही जोडी असल्यामुळे तुंडाच्या जबाबातून यासीनची भरपूर माहिती मिळाली आणि त्याच्या हातात बेड्या पडल्या.
