दाभोळकरहत्त्या तपास प्रकरणी तपासाची गती वाढविणार : अजित पवार

पुणे, – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी तपासप्रकरणी आवश्यक त्या सर्व सुविधा घेवून तपासाला गती द्यावी, असे आपण गृहविभागाला सांगितले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषीक वितरण पवार यांच्या हस्ते झाले यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, डॉ. दाभोलकरांची हत्या होउन दहा दिवस उलटले असूनही मारेकरी मोकाट आहेत हे दुर्दैव आहे. हा तपास सीबीआय कडे सोपविण्याची मागणी होत आहे त्याविषयी बोलताना पवार म्हणाले पोलिस, एटीएस या शिवाय ज्या कोणत्या तपास यंत्रणेची मदत घ्यावी लागेल त्यांची मदत घेण्यात येइल तसेच सर्व तपास यंत्रणांना सर्व प्राअरची मदत पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ आणि एटीसचे प्रमुख राकेश मारीया या प्रकरणाचा संपुर्ण तपास करत आहेत. कोणत्याही राजकिय हस्तक्षेपाशिवाय त्यांना तपास मोहिम राबविण्यास पाठिंबा दिलेला आहे. राज्यात 19 तपास पथके यासाठी कार्यकरत आहेत, अनेकांची चौकशी करण्यात येत आहे मात्र त्यातुन धागेदोरे मिळालेले नाहीत.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजिनामा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती त्या संदर्भात बोलताना पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा व आपली मते मंडण्याचा अधिकार आहे. डॉ. दाभोळकर अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करत होते कोणत्याही व्यवहारात अडकलेले नव्हते, कोणाशीही वाकडे नसलेल्या पुरोगामी व्यक्तीची हत्या झाली आहे. यामागे सनातन व्यक्ती आहेत का याचा शोध सूरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.