लोकसभेसाठी मनसेचे तीन उमेदवार जाहीर

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची दहीहंडीच्या मुहूर्तावर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे उत्सावाच्या पार्श्वभूमीवर नावे जाहीर करून मनसेने बाजी मारल्याचे दिसत आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर आणि ईशान्य मुंबईतून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्यावर राज ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मनसेने नांदगावकर, शिरोडकर आणि नलावडे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उठवत युतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा करणा-या भाजपचे तोंड बंद केले आहे.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या निमित्ताने या उमेदवारांना घराघरात नेण्याचा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. दहीहंडीच्या मुहूर्तावर ही नावे जाहीर करून मनसेनेने चर्चेत राहण्याची धडपड सुरू केली आहे. लोकसभेच्या उमेदवारांवरून अन्य पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मात्र, मनसेनेने एक पाऊल पुढे टाकत निवडणुकीचा राजकीय रंग भरला आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून सणांचा मुहूर्त काढल्याचे दिसत आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने यापूर्वीच आपले पाय रोवले आहेत. राज यांनीही तेथेच लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर घाई करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवारांचा मतदारांशी संवाद वाढावा यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे. लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज यांनी बोलावलेल्या बैठकीला नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रीटा गुप्ता; तसेच या मतदारसंघांतील विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित होते.