मुंबई – देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना गाजत असतानाच भाजपाच्या खासदार आणि मागच्या पिढीतील स्वप्नसुंदरी म्हणवली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी महिलांनी शक्यतो एकट्याने घराबाहेर पडू नये असा महिलांना सल्ला दिला आहे. एकट्याने फिरल्यामुळेच अत्याचाराच्या घटना घडतात. त्यामुळे सावध राहिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु त्यांच्या या टिप्पणीवरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे.
महिलांनी एकटे फिरणे टाळावे : हेमा मालिनी
महिलांनी घराबाहेर फिरणे आणि फिरताना त्यांनी सुरक्षित असणे ही समाजाच्या अभिमानाची बाब आहे परंतु स्थिती वाईट आहे म्हणून शक्यतो महिलांनी एकटे फिरू नये, कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतो असे हेमा मालिनी यांनी प्रतिपादन केले. द्रौपदीवर अत्याचार झाला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आले मात्र आताच्या काळात आपणही तेवढे पुण्यवान राहिलेलो नाही आणि महिलांना वाचवणारा श्रीकृष्णही नाही. हे लक्षात घेतले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
देशभरामध्ये महिलांच्या संबंधात चर्चा सुरू आहे आणि त्यांना एकटे फिरता आले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत हेमा मालिनी यांनी केलेली ही टिप्पणी वादग्रस्त ठरण्याची शक्यता दिसत आहे. विशेषतः मुंबईत बलात्कार झालेली पत्रकार महिला ही सोबत एका पुरुष सहकार्याला घेऊन गेली होती. ही गोष्ट हेमा मालिनी यांच्या नजरेस आणून दिली जाण्याची शक्यता आहे.
