नवी दिल्ली – आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी आता त्यांचा मुलगा नारायण साई पुढे आला आहे. `बापुंवर बलात्काराचा आरोप करणारी मुलगी वेडी झाली आहे.` असे राजकोटमध्ये एका सत्संगादरम्यान त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी बापूंची प्रवक्ता नीलम दुबे हीने आसाराम बापूची तुलना गुरुनानक देव यांच्याशी केली होती. याविरुद्ध शिरोमणी अकाली दल आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमेटीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आणि नीलम यांच्या अटकेची मागणी केली.
आसाराम बापूनी एखाद्याने कोणत्याही मुलीवर मी बलात्कार केल्याचे सिद्ध केले तर त्याला पाच लाखांचे बक्षीस देईन असे जाहीर केले आहे. दुसरीकडे काही राजकीय कार्यकर्ते आसाराम यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. भाजप नेत्या उमा भारती आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी बापूंवर केले जाणारे सगळे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसच्या दिग्विजय सिंह म्हणाले, ‘आसाराम या खोटारड्या गुरुवर बलात्काराचे आरोप पहिल्यांदाच लागलेले नाहीत. तर याआधीही असे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यांनी पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करू नये.’ यापूर्वी जोधपूरच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आसाराम बापूंवर झाला होता.