ओम पुरीने फेटाळले पत्नीला मारहाणीचे आरोप

मुंबई-अभिनेते ओम पुरी यांनी पत्नी नंदिता यांनी केलेले मारहाणीचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. ‘जर घरात काठीच नसेल तर मी पत्नीला काठीने मारहाण करूच कसा शकतो? जर काठीने मारहाण झाली असेल तर त्या काठीची फॉरेन्सिक टेस्ट व्हायला हवी’ अशी प्रतिक्रिया ओम पुरी यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलेले ओम पुरी गुरूवारी सत्र न्यायालयासमोर हजर झाले . सत्र न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या अटकेवर ३० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. ‘नंदिताने यापूर्वीही माझ्यावर आणि माझ्या पहिल्या पत्नीवर – सीमावर मुलाच्या अपहरणाचा आरोप केला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी ती आपल्या आरोपांवर पलटी खाल्ली. केवळ अशी शक्यता आहे, असे मला म्हणायचे होते असे म्हटले… या घटनेवरून तिची मानसिकता लक्षात येऊ शकते’ असे ओम पुरी यांनी स्पीष्ट केले आहे.

पत्नीच्या आरोपानंतर ओम पुरी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते नंदिताला योग्य तिच्या आणि मुलाच्या खर्चासाठी भली मोठी रक्कम देतात. पण नंदिता ग्रामीण भागातून आली असली तरी खूप खर्चिक आहे. ‘तिला केवळ आयुष्यभर मिसेस पुरी म्हणून मिरवायचेय त्यामुळेच ती मला घटस्फोटही देत नाही. सोबतच मी तिला सध्या देत असलेले पैसेही तिच्या हातून जाण्याची तिला भीती त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment