कलमाडींच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये काँग्रेसमंत्र्यांची मोठी उपस्थिती !

पुणे, – पुणे फेस्टिव्हल यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या फेस्टिव्हलची संधी साधून खासदार सुरेश कलमाडी कमबॅकसाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. उद्घाटनासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व कायदामंत्री कपील सिब्बल यांच्यासह राज्य पर्यटनमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी बड्या काँग्रेस नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे येत्या 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा. केंद्रीय दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान व कायदामंत्री कपील सिब्बल यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. अभिनेत्री हेमा मालिनी, उपाध्यक्ष सबिना संगवी, गायत्रीदेवी पटवर्धन, मुख्य समन्वयक कृष्णकांत कुदळे आदी यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांची यादी पाहून हा कार्यक्रम पुणे मेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा आहे की काँग्रेसचा मेळावा या प्रश्‍नाला उत्तर देताना कलमाडी म्हणाले, ‘फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी दरवर्षीच नेत्यांना आमंत्रित केले जाते, त्यात अभिनेत्यांचाही समावेश असतो. यंदा या नेत्यांना आमंत्रित केले आहे. गेली 31 वर्षे लोकसभा आणि राज्यसभेत मी प्रत्येकवेळी ‘कमबॅकम करीत आहे. त्यामुळे यंदाही मीच कमबॅक करणार, असे त्यांनी बोलून दाखविले.

पुणे मेस्टिव्हलचे उद्घाटन 13 सप्टेंबरला
फेस्टिव्हल कमिटी आणि केंद्र सरकारचा पर्यटन विभाग तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे फेस्टिव्हलचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दि. 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून 13 सप्टेंबरला उद्घाटन सोहळा होणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांनी दिली.

गणेश कला क्रीडा मंच येथे दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा. केंद्रीय दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान व कायदामंत्री कपील सिब्बल यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय फेस्टिव्हलमधील कार्यक्रमांचे सदरीकरण शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, याशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, गोल्म क्लब, येरवडा, लोकमान्य सभागृह, जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भोसरी या ठिकाणी होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी हेमा मालिनी ‘राधा रासबिहारी’ हा बॅले सादर करणार आहेत. तसेच फेस्टिव्हल दरम्यान, व्हिंंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरसिया, सेल्वा गणेश, यू. श्रीनिवासन, श्री पार्थसारथी, राजकुमार मिश्रा आदींचे कार्यक्रम, लावणी, ऑल इंडिया ऊर्दू मुशायरा, हिंदी हास्य-कवी संमेलन, केरळ महोत्सव आदी या रौप्यमहोत्सवी फेस्टिव्हलची खास आकर्षणे असणार आहेत. पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी दिला जाणारा ‘पुणे फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड’ आर्य संगीत प्रसारक मंडळ आणि बैलगाडी स्पर्धेचे ज्येष्ठ संयोजक ज्ञानोबा लांडगे यांना जाहीर झाला आहे. तर यंदा शताब्दीपूर्ण करणार्‍या कॅम्पातील श्रीपाद सार्वजनिक गणेश मंडळास ‘जय गणेश पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण
अभिनेत्री हेमा मालिनी, ईशा आणि अहना यांची गणेशवंदना, पुणे फेस्टिव्हलच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीची ध्वनीफीत सादरीकरण, तुकारम दैठणकर यांचे सनईवादन, ‘जाणताराजा’ या महानाट्यातील शिवराज्याभिषेक सोहळा आणि उर्मिला मातोंडकर, ईशा कोप्पीकर, वर्षा ऊसगांवकर, तेजस्विनी लोणकर, शर्वरी जमेनीस, श्रुती मराठे यांची लावणी-कथ्थकची जुगलबंदी हे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.