
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणार्याख कान्हा अभयारण्याला भेट द्यायची ती वाघ पाहण्यासाठी. खराखुरा पट्टेरी वाघ आणि त्याच्याबरोबरच असंख्य हरणे, अस्वले, बिबटे, बाराशिगे यांचे दर्शन या अभयारण्यात होते. मंडला बालाघाट जिल्ह्यातील हे अभयारण्य म्हणजे मुळची दोन अभयारण्ये. १ जून ५५ साली मध्य भारतातले हे सर्वात मोठे अभयारण्य पहिले नॅशनल पार्क म्हणून जाहीर केले गेले. भारतातून नामशेष होत चाललेल्या वाघांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी येथे १९७४ ला व्याघ्र प्रकल्पाची सुरवात केली गेली.
अरण्यवाचन करण्यासाठी अतिशय योग्य असलेले हे ठिकाण नैसर्गिक सौदर्याने परिपूर्ण आहे. अथांग पसरलेली गवताळ कुरणे, १ हजारांपेक्षा जास्त जातीची विविध फुलझाडे, रानफुले, दाट झाडी, टेकड्यांच्या उतारावरची बांबूंची बने कुणाचेही मन मोहित करतील. व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट केलेली अनेक खेडी आजही येथे आहेतच. दूरवर पसरलेल्या कुरणातील गवतही अनेक प्रकारचे आहे. मध्ये मध्ये असलेली तळी डोळ्यांना अधिक गारवा देणारी. बाराशिगे, हरणे, कोल्हे, लांडगे, रानमांजरे, रानकुत्री, सांबर आणि नीलगायीचेही दर्शन येथे होते. अर्थात मुख्य आकर्षण वाघोबा. त्याचे दर्शन होण्यासाठी मात्र नशीबच जोरावर हवे. तसेच दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याची तयारीही हवी. जंगल म्हणजे माकडे हवीतच. त्याचबरोबर अजगर, कोब्रा, व्हायपर्स, रॅट स्नेक, हरणटोळ या जातीचे सापही येथे दर्शन देतात. क्वचित कधीतरी कासवेही दिसतात.
मध्यप्रदेश पर्यटन विभागाने येथे अत्यंत चांगल्या सोयी पर्यटकांसाठी उपलब्ध केल्या आहेत शिवाय वाघ पाहण्यासाठी जंगलात आत जावे लागते त्यासाठी जीप राईडचीही सोय आहे. येथील वनसंरक्षकांना वाघांच्या शिकारीच्या वेळा तसेच जागा यांची चांगली माहिती आहे. आणि त्यामुळे हरप्रयत्नाने ते पर्यटकांना वाघ दिसेलच याची पुरेपूर काळजीही घेतात. वाघ हमखास दिसायला हवा असेल तर मात्र उन्हाळ्यात या ठिकाणाला भेट द्यावी. उन्हाळ्यात पाण्यासाठी येणारे वाघाबरोबरच अन्य प्राणीही त्यामुळे पहावयास मिळतात. अभयारण्यात इलेफंट राईडचीही व्यवस्था आहे. जेवणाखाण्याच्या , राहण्याच्या सोयी उत्तम मात्र आधी आरक्षण केल्याशिवाय जाऊ नये. इतकी काळजी घ्यायला हवीच.
जबलपूर अथवा नागपूर येथूनही कान्हा येथे जाणे सोयीचे आहे. जीप टॅक्सी अशी वाहन व्यवस्था सहजपणे होऊ शकते. मात्र जंगलात जाताना तेथे जे नियम पाळणे आवश्यक आहे ते आवर्जून पाळावेत. कारण शेवटी ते जंगली प्राण्यांचे राज्य आहे आणि जंगलचा कायदा मोडला तर एखादेवेळी प्राणावर बेतायची शक्यता.