भाजपा-सपा यांच्यात फिक्सिंग

उत्तर प्रदेशात ८४ कोसी परिक्रमेवरून भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे पण त्यावर कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंंग यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया योग्य वाटते. अयोध्येत आज जे काही सुरू आहे त्यात भाजपा आणि समाजवादी पार्टी यांचे मॅच फिक्सिंग आहे असे ते म्हणाले. एकूण स्थिती पाहिली म्हणजे ते खरेही वाटते. कारण अयोध्येच्या परिसरात १९९० सालचे वातावरण तयार केले जात आहे. भाजपाने ८४ कोसी परिक्रमा काढली आहे तर सपाने तिला विरोध केला आहे. विश्‍व हिंदू परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या अटकेने मुस्लिमांची सहानुभूती समाजवादी पार्टीला मिळणार आहे. अशा स्थितीत आपले काय होणार अशी भीती कॉंग्रेसला वाटत असल्याने आज कॉंग्रेसच्या नेत्यांनी संसदेत विश्‍व हिंदू परिषदेला लक्ष्य केले. भाजपा आणि विहिंपने आपला हिंदुत्वाचा अजेंडा समोर ठेवला आहे आणि त्यांच्यावर कथित कठोर कारवाई करून समाजवादी पार्टीच्या अखिलेश सरकारने मुस्लिमांची मते पक्की केली आहेत. या राजकारणात आता कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे.

मुलायमसिंग यांच्या समाजवादी पार्टीला मुस्लिमांची मते हवी आहेत. पण ती मिळायची असतील तर आपण मुस्लिमांचे मसिहा आहोत हे आधी दाखवून द्यावे लागेल. मसिहा हा समाजाला संकटातून वाचवत असतो. मात्र ते त्या समाजाला कळायचे असेल तर आधी या समाजावर संकट आले पाहिजे. ते आले नाही तर मग त्यांना आपण वाचवतो हे त्यांना कळणार कसे ? मग संकट आले नाही तर ते आणायची व्यवस्था मसिहालाच करावी लागते. यादव तशी ती करीत आहेत. विश्‍व हिंदू परिषदेलाही हेच हवे आहे. त्यांना परिक्रमा सुरू करायची आहे पण ती परिक्रमा सुखाने पार पडली तर हिंदूंना भावनिक आवाहन करता येणार नाही. म्हणून गोंधळ झाला पाहिजे. हिंदूंवर लाठ्या चालल्या पाहिजेत. रामाच्या कामाला कोणी तरी विरोध केला पाहिजे. हिंदुत्व वादी शक्ती हिंदूंच्या भावनेला हात घालत आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांच्या भावना पायदळी तुडवल्याचे सोंग आणून मुस्लिमांना राजी करीत आहे. गोंधळ होणे भाजपासाठी तर गोंधळाच्या विरोधात कारवाई करणे सपासाठी आवश्यक आहे.

या गोंधळाशिवाय राज्यात हिंदू- मुस्लिम मतांचे ध्रुविकरण होणार नाही जे दोघांनाही हवे आहे. गेल्या आठवड्यात विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि समाजावादी पार्टीैचे नेते मुलायमसिंग यादव यांची भेट झाली. या भेटीत एकाने परिक्रमा काढायची आणि दुसर्‍याने तिला विरोध करायचा असे नाटक ठरले आहे. नेत्यांची एक गोष्ट बरी असते. ते लोकांच्या भावना चेतवून मते प्राप्त करण्याची एकेक चांगली युक्ती लढवत असतात. त्यातलाच हा प्रकार आहे. हे लोक स्वत:च बागुलबोवा उभा करतात आणि लोकांना घाबरवतात. मग लोकांना त्यापासून वाचवण्याचे आश्‍वासन हेच लोक देतात आणि त्या बदल्यात मते मागतात. या नीतीचे शेलके उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले जमीन धारणा धोरणावरून उठलेले वादळ. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्राक्ष बागायतदारांच्या मेळाव्यात बोलताना कमाल जमीन धारणा कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. जमीन धारणा कमी होणार म्हणून शेतकर्‍यांत मोठी अस्वस्थता आहे. तिचा फायदा घेऊन पवारांनी ही ग्वाही दिली. ती मिळताच शेतकर्‍यांनी टाळ्या वाजवल्या. त्या कमी होताच पवार म्हणाले, पण जमीन धारणा कमी होऊ नये यासाठी आपण आम्हालाच सत्तेवर ठेवले पाहिजे.

आता कमाल जमीन धारणा कमी होणार असल्याची आवई पवारांच्या सरकारनेच उठवली आहे. त्यासाठी एक धोरणात्मक दस्तावेज तयार करून जाहीर केला आहे. तो केन्द्रातल्या सरकारनेच तयार आहे. म्हणजे जमिनी कमी होणार असे त्यांनीच म्हणायचे आणि जमिनी कमी होऊ नये यासाठी त्यांनीच मते मागायची. लोकांना मूर्ख बनवायचा हा प्रकार आहे. मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात निष्पाप मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली आणि तीन वर्षे जेलमध्ये ठेवले. हा अन्याय आहे. तो दूर करण्यासाठी मते द्या असे पवार म्हणाले. ते त्याच्यावरच्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी बाह्या सरसावून पुढे आले पण ती अन्यायकारक अटक त्यांच्याच सरकारने केली होती. पवारांनी या मुस्लिम तरुणांच्या अन्यायावर टाळ्यांची वाक्ये टाकली तेव्हा लोक हुरळून गेले पण या मुस्लिम तरुणांवर केलेला अन्याय पवारांच्या महाराष्ट्रातल्या सरकारनेच केला होता हे लोक विसरले होते. म्हणजे संकट त्यांनीच निर्माण करायचे आणि त्याचे निवारण करण्याचा आव आणून मतेही त्यांनीच मागायची असा हा प्रकार आहे.