प्रवीण तोगडिया, सिंघल यांना अटक

अयोध्या- विश्व हिंदू परिषदेची परिक्रमा यात्रा रविवारी रोखली, तर प्रवीण तोगडिया यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अयोध्येत रविवारी पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक करण्यात आली आहे. परिक्रमा यात्रेसाठी ते फैजाबादला जाण्यासाठी निघाले असता अमौसी विमानतळावर अटक केली.

विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेल्या परिक्रमा यात्रेला रविवारपासून सुरुवात होते. या यात्रेला उत्तर प्रदेश सरकारने रेड सिग्नल दिला आहे. मात्र विश्व हिंदू परिषद यात्रेवर ठाम आहे.

ही यात्रा रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जवळपास ३०० विहिंप नेत्यांना अटक करण्यात आली. काहीजणांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप विहिंप नेत्यांनी केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तर प्रदेशात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

जातीय सलोखा बिघडण्याच्या कारणावरून राज्य सरकारने यात्रेला परवानगी नाकारल्यानं प्रशासकीय पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची खबरदारी घेतली जात आहे.

Leave a Comment