‘साधना’च्या संपादकपदी विनोद सिरसाट

पुणे, – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर साधनाच्या संपादकपदी विनोद सिरसाट यांची, तर विश्‍वस्तपदी डॉ. हमिद दाभोलकर यांची निवड शनिवारी झालेल्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत करण्यात आली.

आमदार आप्पासाहेब सा. रे. पाटील, वनराईचे डॉ. मोहन धारीया, ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत साधनाच्या कार्यालयात ही बैठक झाली. सिरसाट हे अनेक वर्षापासून साधनाशी निगडीत आहेत. सुरूवातीच्या काळात युवा संपादक आणि सध्या ते कार्यकारी संपादकपदाची धुरा सांभाळत होते.
साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादनाची धुरा यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, वसंत बापट, सदानंद वर्दे आणि अलीकडच्या काही वर्षांत ही जबाबदारी डॉ. नरेंद्र दाभोलकर सांभाळत होते.

साने गुरुजी यांच्याच विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेल्या या साप्ताहिकात पुढे काळानुरुप तसेच संपादकांनुसार काही बदल झाले. मात्र पुरोगामी विचारांचा वारसा अंकातून सुरू राहिला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंकातील संपादकीय बदलून बाकी अंक पूर्वनियोजनानुसारच छपाईसाठी पाठविला आहे. साधनेचा पुढील अंक 1 सप्टेंबर रोजी बाजारात येणारा हा डॉ. दाभोळकर विशेषांक असेल, असे सिरसाट यांनी सांगितले.

Leave a Comment