फक्त नावातच… ‘पोपट’

ही कथा आहे कुलपे गावातील बकुळ चिचुके (सिद्धार्थ मेनन), रघुनाथ हिवाळे (अमेय वाघ), मुकुंद बोराटे (केतन पवार) या तिघा मित्रांची. तिघांच्या आवडी-निवडी वेगळ्या तरी मैत्री मात्र ‘घट्ट’. आयुष्यात मोठ्ठं व्हायचं स्वप्न पाहणारे हे तिघे… पण कसे ते न कळणारे… गावात एडस जनजागृतीचं सरकारी अभियान येतं… गावचा सरपंच या तिघांवर कामाची जबाबदारी सोपवतो… आपल्यापरीने ते काम करूही लागतात… पण असे काही घडते की ज्यामुळे तिघे एका ध्येयाने प्रेरित होतात… स्वत: चित्रपट बनवण्याचे ठरवतात… त्यांना साथ मिळते शेजारच्या गावातील फोटोग्राफर जनार्दनची (अतुल कुलकर्णी). रघुनाथ हिवाळे ऊर्फ रघ्या नायक तर नायिका होते बकुळ ऊर्फ बाळाची मैत्रिण दर्शना (नेहा शितोळे). चित्रपटाचा विषय ‘एड्स’ ठरतो… काम सुरू होते… मग जे काही घडते ते रजत पडद्यावर पाहण्यासारखे.

दिग्दर्शक सतीश राजवाडेचा ‘ग्रामीण’ बाज असलेला हा पहिलाच चित्रपट. त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच योग्य. बाकी त्यांच्या स्टाईलने एक उत्तम चित्रपट म्हणावा लागेल. अर्थात यात त्यांना सिद्धार्थ मेनन, अमेय वाघ, केतन पवार या नवकलाकारांनी उत्तम साथ दिली असून अतुल कुलकर्णी चित्रपटातला प्लस पॉइंटच मानावा लागेल आणि अनिता दाते, नेहा शितोळेेनेही आपल्या व्यक्तीरेखांना योग्य तो न्याय दिला आहे.

हलका-फुलका वाटणारा हा सिनेमा काही वेळा गंभीरतेकडे वळतो. पण ते खटकत नसून विचार करायला लावणारे आहे. थोडक्यात, मनोरंजनातून एक चांगला संदेश हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहचविण्यात यशस्वी ठरतो. काही ठिकाणी संथ होत असला तरी आपली उत्सुकता टिकविण्यात सफल ठरणारा असा हा चित्रपट. अर्थात याला जर गीत- संगीताची साथही तेवढीच श्रवणीय लाभली असती तर योग्यच होते. पण तसे नसले तरी ठीक म्हणावे इतके ते बरे आहे.

खरं तर ‘पोपट’ शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. या चित्रपटात असणारा अर्थ नक्कीच प्रेक्षकांना जाणवणारा आहे आणि यातील कलाकारांनी तो इतक्या चांगल्यारित्या मांडला आहे की, या चित्रपटाचा ‘पोपट’ न होता तो फक्त नावापुरताच राहिला आहे. त्यामुळे नक्की पाहण्यासारखा असा हा ‘पोपट’ एकदा तरी पाहायलाच हवा.
निर्मिती- मिराह एंटरटेन्मेंट
कथा- दिग्दर्शन- सतीश राजवाडे
कलाकार- अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, केतन पवार, सिद्धार्थ मेनन, अनिता दाते, नेहा शितोळे, मेघा घाडगे

Leave a Comment