मनोरंजना पलिकडचा ‘मद्रास कॅफे’

बॉलिवुडपटात प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली चित्रपटात भरपूर सारे प्रेम गीत, नाच-गाणं किंवा आयटम साँगचा मसाला भरलेला दिसतो. परंतु,सुजित सरकार दिग्दर्शित मद्रास कॅफे हा चित्रपट मुख्य प्रवाहातून बाहेर पडून काहीतरी वेगळं प्रेक्षकांपुढे मांडण्यात यशस्वी झाला आहे. समाज आणि सत्यता यांची सागड घालण्याचा प्रयत्न सुजितने केला आहे.

मद्रास कॅफे ही भारतीय गुप्तचर यंत्रणेत काम करणार्‍या विक्रम सिंह (जॉन अब्राहम) ची कथा आहे. श्रीलंका सिव्हिल वॉर दरम्यान अंडरकव्हर रॉ एजंट असलेलेया एजंटला एका ऑपरेशनसाठी जाफनामध्ये पाठवण्यात येते. विक्रमकडे जाफनाच्या एलटीएफ’शी (लिबरेशन ऑफ तामिळ फ्रंट) संबंधित नेता अन्ना याला हिंसात्मक कारवायांपासून रोखण्याबरोबरच शांतीसेनेला या भागाचा ताबा मिळवण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जबाबदार्‍या पार पाडण्याचा प्रयत्न करतानाच त्याला समजते की इथे फक्त वांशिक युद्ध सूरू आहे असे नाही तर त्यापेक्षा पुढच्या टप्प्यावर इथली परिस्थिती गेलेली आहे.

या चित्रपटातील घटना आणि पात्र एकमेकांसोबत अशा पद्धतीनं सुजितने गुंफल्या आहेत की त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या कथेशी एकरुप होतो. शांतीचे प्रयत्न असफल ठरल्यानंतरही श्रीलंकेच्या वांशिक हिंसाचाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी भारत कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सहभागी राहिलेला आहे. ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी एक बाजू आहेत त्यांच्याशी निगडीत काही घटनांचे संदर्भ येथे पाहायला मिळतात.

चित्रपट सुरुवातीपासूनच प्रेक्षकांवर ताबा मिळवण्यात सफल झालाय. युद्धाची जबरदस्त दृष्ये प्रेक्षकांना हादरवून टाकणारे आहेत. चित्रपट संपल्यानंतरही ही दृश्यं लवकर डोळ्यांसमोरून हलण्यास तयार होत नाही. एका दृश्यात जॉनच्या एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. हा सीन कोणत्याही अतिरेकाशिवायही अतिशय प्रभावी झालाय. या दृश्यातलं दु:ख प्रेक्षकांनाही जवळचं आणि खरंखुरं भासतं. अ‍ॅक्शनपटात ‘ लार्जर दॅन लाईफ’ हिरो आपल्याला नेहमीच दिसतो तसा हिरो दाहवणे सुजितने कटाक्षाने टाळले आहे आणि हेच हा चित्रपट प्रभावी होण्यामागील प्रमुख कारण आहे.

जॉन अब्राहमचा आत्तापर्यंत हा सर्वोत्कृष्ठ परफॉर्मन्स आहे त्याचा हा अभिनय आपल्याला अचंबित करणारा आहे. सुजीत सरकार तर आपल्याला हवे ते उत्तम पधतीने सादर करतो हे आपण विकी डोनरच्या निमिताने अनुभवले आहेच. मद्रास कॅफेमध्ये तुम्हाला मोठा आश्चर्याचा झटका देते नर्गिस फाकरी… हा चित्रपट तिच्या उल्लेखाशिवाय अर्धवट ठरेल. मूळ भारतीय पण एक ब्रिटिश पत्रकार जया साहनी’च्या भूमिकेला तिनं पुरेपूर न्याय दिलाय. सिद्धार्थ बसूनंही आपल्या पहिल्याच चित्रपटात रॉ डायरेक्टर रॉबिन दत्तची भूमिका पार पाडलीय. एका गुप्तचर संघटनेच्या अधिकार्‍याच्या भूमिकेत तो शोभून दिसतो. चित्रपटात एकही गाणे नाही पण शंतनु मोईत्राचं बॅकग्राऊंड म्युझिक मात्र भन्नाट झाल आहे. कथेची नेमकी पण दमदार मांडणी आणि जबरदस्त चित्रण यासाठी मद्रास कॅफे बघायलाच हवा.

चित्रपट – मद्रास कॅफे
निर्माता – जॉन अब्राहम
दिग्दर्शक – सुजीत सरकार
संगीत – शंतनु मोइत्रा
कलाकार – जॉन अब्राहम, नरगिस फाखरी आणि राशी खन्ना

 

Leave a Comment