पन्हाळा -शिवाजीराजाचा गड

दक्षिण महाराष्ट्रातील अंबाबाईच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरपासून १८ किमीवर असलेले पन्हाळा हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून ३१७७ मीटर उंचीवर आहे. या हिल स्टेशनला जायचे ते मुक्त वारा अनुभवण्यासाठी तसेच आपल्या शिवाजी राजांचा पन्हाळा गड पाहण्यासाठी. महाराष्ट्रातल्या या छोट्या गावाला नगरपरिषद असून ते अतिशय वेगाने विकसित होत असलेले ठिकाण आहे.

याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याशी असल्याने आपल्या इतिहासाशी ते निगडीत आहे. शिवाजी राजांनी सुमारे ५०० दिवस या पन्हाळा किल्यात विजापूरच्या आदिलशाही बळकट वेढ्यात काढले होते आणि अतिशय हुषारीने हा वेढा फोडून त्यांनी विशाळगड गाठला होता तो महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या बलीदानाने. १७८२ साली ही मराठा साम्राज्याची राजधानी होती त्यानंतर १८२७ मध्ये तेथे ब्रिटीशांनी आपले ठाणे उभे केले. सह्याद्रीच्या कडेखांद्यावर असलेला हा गड दख्खन पठारावरील सर्वात मोठा गड आहे.

इतिहास सांगतो की ११७८ ते १२०९ या काळात या गडाचे बांधकाम केले ते शिलाहार भोज दुसरा याने. नंतर हा गड यादवांकडे आला. १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने तो आणखी बळकट केला. शिवाजीराजांनी १६५९ मध्ये या गडावर हल्ला करून त्यावर १६७३ पर्यंत आपली मालकी कायम ठेवली होती. याच गडाला अफझलखानानेही वेढा घातला होता मात्र तो उठवून लावला गेला. संभाजी राजांना याच गडावर कैदेत ठेवले गेले होते व नंतर येथून सुटका करून घेऊन त परत शिवाजीराजांकडे आले. शिवाजीराजांच्या काळात या गडावर १५ हजार घोडे, २० हजार सैनिक तैनात असत. १४ किमीच्या परिसरात पसरलेल्या या गडाला ११० माच्या आहेत. अनेक भुयारी मार्ग असलेल्या या गडाचे बांधकाम विजापूर स्टाईलचे असून मोरांची शिल्पे येथे जशी दिसतात तशीच भोज राजाच्या काळातील कमळाची शिल्पेही आहेत. गडाची तटबंदी ७ किमी आहे.

पाराशर गुहा या ठिकाणी महर्षी पाराशर यांचा निवास असे असे सांगतात. करवीर पुराणात यांचा उल्लेख पन्नगालय म्हणजे सर्पांचे निवासस्थान असा येतो. महाराष्ट्राचे आद्यकवी मोरोपंत यांनी येथेच त्यांचे काव्यलेखन केले असेही सांगितले जाते. गांधारबावडी ही वैशिष्ठ्यपूर्ण विहीर येथे पाहायला मिळते. किल्ल्याला वेढा पडला की पाण्यात पहिले विष कालवले जायचे. मात्र या तीन मजली विहिरीतील पाण्याचे स्त्रोत पाण्याची कमतरता भासू देत नसत. या विहिरीच्या भिंती इतक्या रूंद की सैनिक तेथे आरामाम मुक्काम करू शकत तसेच येथील भुयारातून किल्ल्याबाहेरही पडू शकत. किल्ल्यातला किल्ला अशीच या बावडीची ओळख. अगदी मुख्य किल्ला पडला तरी येथे आश्रय घेता येत असे. कलावंती महाल, रंगमहाल अंबरखाना ही ठिकाणे आता कल्पनेने पाहायची कारण त्यांची खूपच पडझड झाली आहे.

धर्मकोठी, धान्यकोठार, सज्जा कोठी तसेच सोमेश्वर, अंबाबाई, महाकाली यांची मंदिरेही येथे आहेत. कोल्हापूरपासून सतत बससेवा या ठिकाणी उपलब्ध आहे. स्वत;चे वाहन असेल तर अधिक चांगले. हिल स्टेशन असल्यामुळे निवासाच्या चांगल्या सोयी आहेत तसेच कोल्हापूरचे खास पदार्थ चाखण्याची व्यवस्थाही उत्तम आहे.