पुणे – पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पुण्यात झालेल्या बर्याच हत्याकांडांचा उलगडा अजूनही झालेला नाही, जर पूर्वी झालेल्या हत्यांचे मारेकरी पकडले गेले असते तर डॉ. दाभोलकरांची हत्याच झाली नसती, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यात व्यक्त केले. तसेच आपण सातार्यात दाभोलकरांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
तर दाभोळकराची हत्या झालीच नसती – मुंडे
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या म्हणजे माणूसकीची हत्या असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्र्यांनी या हत्येच्या चौकशीसाठी हवे तसे प्रयत्न केले नाही असा आरोपही मुंडेंनी यावेळी केला. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाची गती जर अशीच राहिली तर मारेकरी सापडणार तरी कसे? दाभोळकरांचे मारेकरी अजूनही मोकाट असणे हे अत्यंत दुर्भाग्याचे लक्षण आहे अशा शब्दांत मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विचारांचा मुकाबला विचारांनी करायला हवा. कोणावरही बंदी घालू नये, कारण बंदी घालून कोणाचाही विचार दाबता येणार नाही असे मुंडे यावेळी म्हणाले. गेली दोन तप अंधश्रद्धांच्या विरोधात लढा देणार्या आणि लोकचळवळीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढणार्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची अज्ञात मारेकर्यांनी मंगळवारी सकाळी गोळ्या पुण्यात झाडून हत्या केली होती.