ऐश्वर्याच्या जागी लागली प्रियांकाची वर्णी

संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या सिनेमातील आयटम सॉंगने पुन्हा एकदा नवीन चर्चा घडवून आणली आहे. ‘रामलीला’साठी आयटम गर्ल म्हणून कोण काम करील, याच्या शोधात भन्साळी होते. अर्थात भन्साळी यांची पहिली पसंती ऐश्वर्या राय होती. परंतु कुठेतरी माशी शिंकली आणि या जागी प्रियांका चोप्राची वर्णी लागली. ऐश्वर्याच्या जागी लागलेली ही प्रियांकाची वर्णी बच्चन कुटुंबीयांचा वर्मी लागली आहे.

अनेकदा सिनेमामध्ये नवीन इनिंग सुरु करण्यासाठी आयटम सॉंग हा एकमेव बेस्ट पर्याय ठरतो याचा उत्तम दाखला म्हणजे माधुरीने ‘ये जवानी हैं दिवानी’ मध्ये केलेले नृत्य. ऐश्वर्यानेही परत चित्रपटात येण्यासाठी हाच रस्ता निवडला होता. आयटम सॉंग करण्यासाठी ती तयार झाली होती. पण ऐनवेळी प्रियांकाने मात्र मागून येऊन संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’मध्ये शिरकाव केला. ऐश्वर्याची या आयटम सॉँगसंदर्भात भन्साळींशी अंतिम बोलणीही झाली होती.

ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे मात्र ऐश्वर्याला माघार घ्यावी लागली आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘गुंडे’, ‘मेरी कोम’ या चित्रपटांमध्ये सध्या प्रियांका व्यस्त आहे. या व्यस्त वेळापत्रकामधूनही तिने वेळ काढून ‘रामलीला’तील आयटम सॉँग करण्यास होकार दिला. सध्या प्रियांकाची चलती पाहता संजय लीला भन्साळीही तिला नाही म्हणू शकले नाहीत.