सॅमसंग भारतात नंबर वन वर

नवी दिल्ली – भारतात मोबाईल फोनच्या विक्रीच्या आणि सेवेच्या बाबतीत सॅमसंग कंपनीने नोकियाला मागे टाकले असून २०१३ च्या पहिल्या तिमाहीत नोकियापेक्षा अधिक धंदा केला आहे. आयडीसी या व्यापाराच्या क्षेत्रातल्या गुप्तचर संस्थेने केलेल्या पाहणीत ही गोष्ट उघड झाली आहे. सॅमसंग पहिला, नोकिया दुसरा, मायक्रोमॅक्स तिसरा आणि कार्बनचा चौथा क्रमांक असल्याचे आयडीसीने म्हटले आहे.

भारतात जानेवारी ते मार्च या तिमाहीत ६ कोटी ७३ लाख मोबाईल फोन विकले गेले. त्यातले १६ टक्के मोबाईल फोन सॅमसंग कंपनीने विकले. या मार्केटमधला नोकियाचा वाटा १५ टक्के इतका राहिला. तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दोन्ही कंपन्यांना मार्केटमधला प्रत्येकी ७ टक्क्याचा वाटा मिळाला. सॅमसंग कंपनी बाजारात आक्रमकपणे उतरण्याच्या आधी नोकिया कंपनी फॉर्मात होती. पण तिचा तोरा आता उतरला आहे.

सर्वसाधारण मोबाईल फोन असे क्रमांक असले तरी स्मार्ट फोनच्या विक्रीमध्ये नोकियाचा नंबर बराच खाली घसरलेला आहे. या प्रकारच्या फोनमध्ये सॅमसंगचा वाटा ३२ टक्के आहे. मायक्रोमॅक्सने याबाबतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. (१८.८ टक्के) कार्बन कंपनीने १०.९ टक्के मार्केट काबीज करून तिसरा क्रमांक मिळवला आहे. सोनी आणि नोकिया हे चौथ्या क्रमांकावर असून त्या दोघांचीही स्मार्ट फोनची विक्री प्रत्येकी ५.९ टक्के एवढी आहे.

Leave a Comment