क्वेट्टा – पाकिस्तानातील क्वेट्टा येथून बाँब बनविण्याचे सुमारे 100 टनापेक्षाअधिक साहित्य आज (बुधवार) पाकिस्तानी सैन्याने टाकलेल्या धाडीमध्ये जप्त करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. अफगाणिस्तानच्या सीमेपसून जवळच असलेले क्वेट्टा शहर हे पाकिस्तानमधील सर्वांत हिंसाचारग्रस्त शहरांपैकी एक असल्याचे मानले जाते. क्वेट्टा ही बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे.
पाकिस्तानात 100 टनापेक्षा अधिक स्फोटके जप्त
क्वेट्टामधील शिया मुस्लीमांना ठार करण्यासाठी करण्यात आलेल्या बाँबस्फोटामध्ये वापरण्यात आलेले बाँब साहित्य व जप्त करण्यात आलेले साहित्य यांमध्ये साम्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. क्वेटामधील शिया भागात काही महिन्यांपूर्वी झालेल्या बाँबस्फोटामध्ये सुमारे 200 शिया मुस्लीम ठार झाले होते.
वेफर्सच्या आवरणाखाली ट्रकमधून 15 टन पोटॅशियम क्लोरेट घेऊन जाणार्या दोन जणांना पाकिस्तानी सैन्याने काल (मंगळवार) अटक केली होती. यानंतर या दोन जणांनी दिलेल्या माहितीनुसार पाक सैन्याने ही धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोटॅशियम क्लोरेट हे बाँब बनविण्याच्या प्रकियेतील महत्त्वपूर्ण रसायन आहे. पाक सैन्याने एका गोदामावर टाकलेल्या या धाडीमध्ये पोटॅशियम क्लोरेट, सर्किट वायर, सल्फर, ऍल्युमिनियम पावडर, बंदुका व शस्त्रसाठा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावेळी पाक सैन्याने दहा जणांना अटक केली. या साठ्यामधील सुमारे 80 डब्यांमध्ये बाँबस्फोट करण्याचे सर्व साहित्य तयार करण्यात आले होते व डिटोनेटर लावताच बाँबस्फोट करता येणे शक्य होते. बलुचिस्तान प्रांतास व विशेषत: क्वेट्टा शहराला असलेला धोका टळल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो,फफ असे पाक सैन्यामधील कर्नल मकबूल शाह यांनी सांगितले. मात्र, हे गोदाम कोणत्या दहशतवादी संघटनेच्या नियंत्रणाखाली होते, याबद्दल अद्याप असंदिग्धता आहे.
