कांदा महाग पण शेतकर्‍यांना काय मिळते

नवी दिल्ली – कांद्याचे भाव देशभरात वाढलेले आहेत. काही ठिकाणी तो ७० रुपये प्रति किलो तर काही ठिकाणी ८० रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहेत. परंतु कांद्याचा हा प्रवास शेतापासून ग्राहकांच्या किचनपर्यंत होतो किंवा शेतापासून हॉटेलपर्यंत होतो तेव्हा या प्रवासात त्याच्या विक्रीसाठी तो ज्या ज्या यंत्रणांकडून हाताळला जातो त्या यंत्रणाच त्यावर जास्त पैसे कमावतात. हा कांदा ज्या शेतकर्‍यांच्या घामातून निर्माण होतो त्याला मात्र या ७० किंवा ८० रुपयांतले फार तर १० रुपये मिळतात. नाबार्ड या बँकेतर्फे कांद्याच्या उत्पादन आणि विक्रीबाबत करण्यात आलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली आहे.

दिल्लीच्या काही भाजी बाजारांमध्ये ठोक विक्री आणि किरकोळ विक्री यांच्या दरांविषयी बरेच काही समजून घेण्यात आले. तेव्हा असे लक्षात आले की विक्रेत्यांनी या व्यवहारात माफत नफा कमवण्याचा हेतू ठेवला तर कांदा सामान्य ग्राहकाला फार तर १४ रुपये किलोमध्ये विकला गेला पाहिजे. कारण दिल्लीच्या कोणत्याही मार्केटमध्ये शेतकर्‍यांकडून कांदा विकत घेताना तो ८ रुपये प्रतिकिलो या दराने घेतला जात आहे आणि ७० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

हा विक्रीचा दर पाहिल्यानंतर कोणालाही अचंबा वाटेल परंतु एजंट, दलाल, अडत्ये हे या व्यवहारामध्ये प्रचंड नफा कमावतात आणि मनमानी किंमती लावतात. त्याशिवाय कांदा खरेदी करताना अनेक प्रकारचे गैरव्यवहार होतात. शेतकर्‍यांची लूट होते. त्यांना वजनात फसवले जाते आणि कांद्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकर्‍यांकडून ८ रुपये प्रति किलो दराने घेतला जाणारा कांदा शेवटी ग्राहकांना ८० रुपयांना मिळतो आणि मधले दलाल मात्र गबर होतात. ज्या एक किलो कांद्यातून शेतकर्‍यांना जेमतेम ३ रुपये फायदा होतो त्याच कांद्याच्या विक्रीतून विक्रीच्या साखळीतील प्रत्येक मध्यस्थाला कमीत कमी १५ रुपये फायदा होतो.