स्पॉट फिक्सिन्ग प्रकरणी दाऊदच्या तीन साथीदारांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली – आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील स्पॉटफिक्सिन्ग प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने दाऊदच्या तीन साथीदारांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. जावेद चुतानी, सलमान ऊर्फ मास्टर आणि ऐहतेशाम अशी या तीन जणांची नावे आहेत.

दिल्ली पोलिसांच्या एका विशेष सेलने या तिघांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी एका अर्जाद्वारे न्यायालयात केली होती.हे तिघेही दाऊदचे निकटचे सहकारी असून त्यांनीच ही स्पॉट फिक्सिन्ग प्रकरणाची सारी सूत्रे दाऊदच्या सांगण्यावरून हलवली होती, असा पोलिसांचा कयास आहे.

सध्या हे तिघेही संशयित पाकिस्तानात आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात काहीच अर्थ नाही, अशीही एक बाब आजच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाच्या नजरेला आणून देण्यात आली. तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केले की, हे खुल्या स्वरूपाचे वॉरंट आहे त्याला कोणतीहंी कालमर्यादा नाही.

या तिघांखेरीज संजय आगरवाल, मोहंमद शकील आमिर, प्रवीणकुमार ठक्कर आणि संदीप शर्मा या बुकींच्या विरोधातही वॉरंट जारी करण्याची मागणी पोलिसांनी केली. आयपीएल स्पॉट फिक्सिन्गच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीची चौकशी करण्यात आली असता त्यातून ही नावे समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यानुसार या चार आरोपींच्या विरोधातही विनाजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आली आहेत.

या सार्‍या स्पॉट फिक्सिन्ग प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 39 जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. त्यात क्रिकेटपटू एन श्रीशांत, अनिकेत चव्हाण, अजित चंडेलिया यांचा समावेश आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याच्या कटाचा हा एक व्यापक भाग आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Comment