वॉशिंग्टन – यूरोपातल्या काही संगणक तज्ज्ञांनी वृद्ध व्यक्तींची देखभाल करणारा मोबिझर्व्ह हा रोबोट विकसित केला आहे. हा रोबोट ज्याच्या तैनातीत असेल त्याने वेळेवर औषध घेतले आहे की नाही, व्यायाम केला आहे की नाही आणि वेळेवर भोजन केले आहे की नाही याची देखभाल करील. हा रोबोट तयार करण्यासाठी मोबिझर्व्ह प्रोजेक्ट असा खास प्रकल्प तयार करण्यात आला होता आणि त्यासाठी संगणक तज्ज्ञांना काही कंपन्यांचीही मदत मिळाली होती.
गेली तीन वर्षे धडपड करून अशा प्रकारचा हा रोबोट तयार करण्यात आला असून त्यामध्ये दोन स्टिरिओस्कोपीक कॅमेरे, दोन बोलणारी साधने, काही सेन्सर्स आणि टच स्क्रिन यांचा समावेश आहे. यामध्ये समाविष्ट असलेली बोलणारी साधने माणसाशी बोलतात, त्याचबरोबर माणसाने बोललेले शब्द ऐकून आणि समजून घेतात.
वृद्ध व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हे त्याचे मुख्य काम असेल. संबंधित वृद्ध व्यक्ती ठराविक अंतराने व्यायाम करत नसेल आणि बराच विलंबाने एका जागेवर बसून रहात असेल तर हा रोबोट त्याला उठायला भाग पाडतो आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतो. किती वेळाने औषधे घ्यावीत याचाही प्रोग्राम या रोबोटमध्ये सेट केलेला आहे. त्यामुळे औषधात अनियमितता झाली तर या रोबोटमधले लाईट लागतात आणि संबंधित वृद्ध व्यक्तीला आपले औषध घ्यायचे राहिलेले आहे याची जाणीव होते.