पाकिस्तानातही ‘चेन्नई एक्स्प्रेस’ वेगात

बॉक्स ऑफिसवर १५० कोटीच्या पुढे कमाई ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने केली आहे. भारतात तर शाहरूख आणि दीपीकाची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ वेगात धावत आहे. हीच ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आता पाकिस्तानातही आपली कमाल दाखवत आहे. रविवारी पाकिस्तानच्या चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी पाच कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. आगामी काळात अक्षय कुमारच्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ सिनेमा पाकमध्ये रिलीज होणार आहे.

शाहरूख आणि दीपीकाची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथील चित्रपटगृहांत सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तसेच पहिल्या दिवसाचे सर्व शो हाऊसफुल्ल होते. लाहोर आणि कराचीमधील बहुतांश चित्रपटगृहांबाहेर ब्लॅकने तिकीट विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट १५ कोटींच्या आसपास कमाई करण्याची अपेक्षा आहे.

ईदला पाकमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या पाहता ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी प्रदर्शनाची सर्व दारे बंद झाली होती. मात्र १८ ऑगस्टनंतर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला पाकमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पहिल्याच दिवशी पाकमधील युवा प्रेक्षकांनी चित्रपटास उत्तम प्रतिसाद दिला. पुढील आठवड्यात अक्षय कुमारच्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ सिनेमाला पाकमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली आहे.

Leave a Comment