नवी दिल्ली – दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंड या काँग्रेसशासित तीन राज्यांमध्ये आज केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचे गेम चेंजर पाऊल म्हणून काँग्रेस या योजनेकडे पाहात आहे. दिल्लीत या योजनेचे उद्घाटन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तिचे वर्णन ऐतिहासिक आणि अतुलनीय अशा शब्दांत केले.
दिल्ली, हरियाणा, उत्तराखंडमध्ये अन्न सुरक्षा योजनेचे उद्घाटन
संसदेत अन्न सुरक्षा विधेयक मंजूर होण्याला विलंब लागण्याची चिन्हे आहेत. अर्थात, या विलंबामुळे विचलित न होता आज काँग्रेसने तीन राज्यांत या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी देशाच्या राजधानीत सोनियांनी 12 महिला लाभार्थींना अन्नधान्याची पाकिटे आणि आधारशी संबंधित स्मार्ट कार्ड प्रदान केले. आम आदमीच्या जीवनात क्रांतिकारी परिवर्तन आणत असल्याबद्दल सोनियांनी केंद्रातील यूपीए सरकारचे कौतुक केले. अर्थात, हा लढा अजून संपलेला नाही. अजून बरेच काही करायचे आहे, अशीही भूमिका त्यांनी प्रांजळपणे मांडली. देशातील एकही नागरिक भुकेला राहू नये, कुठलेही बालक उपाशीपोटी झोपू नये यासाठी आम्ही अन्न सुरक्षा योजना आखली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात अन्न सुरक्षा देण्याचे पाऊल संपूर्ण जगात अतुलनीय आहे, असेही त्या म्हणाल्या.
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अन्न सुरक्षा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. दिल्लीत या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. योजनेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि केंद्रीय अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संसदेत अन्न सुरक्षा विधेयकाच्या मंजुरीत अडथळे आणत असल्याबद्दल त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. थॉमस यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. जनतेला अन्न अधिकार प्रदान करण्याच्या प्रक्रियेत मोदी खोडा घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
