नवी दिल्ली – सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत असतानाच दुस-या बाजूला चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात घुसखोरी केली आहे. अरुणाचल प्रदेशच्या चांगलगाम भागात अंदाजे 20 किलोमीटर अंतराच्या परिसरात चीनच्या सैन्याने 13 ऑगस्टच्या दिवशी घुसखोरी केली. एवढचं नाही तर तेथे त्यांनी दोन दिवस वास्तव्यही केले. मात्र भारतीय सैन्य दलाच्या मुख्यालयाने चीनच्या या घुसखोरीचा इन्कार केला आहे.
चीनच्या सैन्य भारतीय हद्दीत आले होते. मात्र ते तेथूनच परत गेले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालताना अशा घटना वारंवार घडत असल्याचे सैन्य दलाच्या सूत्रांनी सांगितले. पिपल लिब्रेशन आर्मी’चे (पीएलए) जवान अरुणाचल प्रदेशातील चांगलगाम येथे अंदाजे 20 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात घुसखोरी केली होती.मात्र भारतीय सैन्याने त्यांना परत जाण्यासाठी फ्लॅग’ दाखवल्याने चीनी सैन्य परत फिरले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत-तिबेट सीमेवर निमलष्करी दलाचे जवानही एलएसीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी उपस्थित होते. याआधी, एप्रिल महिन्यात चीनच्या सैन्याने भारतीय सीमेच्या 19 किलोमीटर अंतरावर घुसखोरी केली होती. गेल्या आठ महिन्यात चीनच्या सैन्याने 150 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. तर भारतीय सैन्यानेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असताना चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्यानेही भारतीय सीमेत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत घुसखोरी सत्र’ सुरुच ठेवले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पाकिस्तानने आतापर्यंत 70 वेळा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे. त्यात पुंछ येथे झालेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले आहेत.