आशियाई स्पर्धेसाठी भारताचे तीन खेळाडू अपात्र

नवी दिल्ली – चीन मध्ये होत असलेल्या दुस-या युवा आशियाई स्पर्धेत जास्ता वय असल्याच्या कारणावरून भारताच्या तीन वेटलिफ्टर्सना नानजिंगमध्ये अपात्र ठरवण्यात आले. जास्त वय असल्यारच्या कारणामुळे आशियाई स्पर्धेतून मायदेशात परत पाठवलेल्या भारताच्या क्रीडापटूंची संख्या आता २४ झाली आहे.

या स्पर्धेतून चंद्रिका तरफदार (महिला ४८ किलो वजनी गट), ज्योती माल (महिला ५३ किलो वजनी गट) अक्षफ भगवान (पुरुष, ६२ किलो वजनी गट) अशी अपात्र ठरवलेल्या तीन वेटलिफ्टर्सची नावे आहेत. दुस-या युवा आशियाई स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले तरी भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने मात्र कारण वेगळेच असल्याचे म्हटले आहे.

वयोमर्यादेत न बसलेल्या भारताच्या १८ अथलीट्सना परत पाठवल्याचा लज्जास्पद प्रकार सोमवारी घडला. तिघा वेटलिफ्टर्सना अपात्र ठरवल्याने त्यात भर पडली. आहे. १८ क्रीडापटूंवर सरकारने केलेला १० लाख रुपयांचा प्रवास खर्च भरून द्यावा, असे साईचे महासंचालक जिजी थॉमसन यांनी एएफआयला फटकारले आहे.

स्थानिक आयोजन समितीने भारताच्या तीन वेटलिफ्टर्सना स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे. मात्र त्यामागील कारण समजू शकलेले नाही, असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.