तेलंगणाची मागणी आणि तिच्यासाठी झालेले आंदोलन ही सरकारसाठी एक डोकेदुखी होऊन बसली होती. ती कमी व्हावी म्हणून सरकारने उशिराने का होईना पण तेलंगण हे नवे राज्य निर्माण करण्याचे ठरवले. एक डोकेदुखी कमी झाली पण आता उर्वरित आंध्रातल्या लोकांची नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. आजवर तेलंगणाच्या निर्मितीसाठी आंदोलन झाले. आता तेलंगण निर्मितीच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. आजवर तेलंगणात एका मागे एक आंदोलन सतत होत गेल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले होते. तेलंगण निर्मितीचा निर्णय झाला आहे आणि त्यामुळे तेलंगणातील आंदोलने थांबली आहेत. असे असले तरीही अजून तेलंगणा अस्तित्वात आलेला नाही. त्याची केवळ घोषणा झालेली आहे. त्याला अजून सात, आठ महिने आहेत आणि तो पर्यंत हा तेलंगणा पूर्वीप्रमाणे आंध्रातच राहणार आहे. आता तेलंगणा वगळता राहिलेल्या आंध्राला सीमांध्रा असे म्हटले जायला लागले आहे. म्हणजे आताचे आंध्र प्रदेश हे राज्य मनाने एकमेकापासून दूर गेलेल्या सीमांध्रा आणि तेलंगण या दोन राज्यांचे बनलेले आहे.
तेलंगण निर्मितीने समाधान झाल्याने तेलंगणात शांतता असली तरी या शांत तेलंगणाची सारी सूत्रे निदान आता तरी अशांत सीमांध्रा भागाच्या हातात आहेत आणि सीमांध्रा भाग आता आंदोलनाने होरपळून निघत आहे. तेलंगणाला विरोध करण्यासाठी सीमांध्रा भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू झालेली आहेत. ती आणखी किती दिवस चालू राहतील हे काही सांगता येत नाही. मसीमांध्रा भागात मात्र नव्या प्रश्नांची बीजे रोवली गेली आहेत. या भागातल्या अनेक शहरांमध्ये जनजीवन आणि प्रशासन दोन्हीही ठप्प झालेली आहेत.अनेक शिक्षण संस्थांमध्ये संपाचे वातावरण आहे आणि उच्च शिक्षण घेणार्या अनेक विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. या भागातले काही विद्यार्थी शिक्षणासाठी तामिळनाडूमध्ये जायला लागले आहेत. कारण त्यांना हे आंदोलनाचे वातावरण लवकरच शांत होईल असे वाटत नाही. तेलंगणाचा प्रश्न सुटल्यानंतर सीमांध्रा भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन होईल याचा अंदाज कॉंग्रेसच्या नेत्यांना आला नसावा. २००० साली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांचे विभाजन करून झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड ही तीन राज्ये निर्माण केली होती. परंतु या तीनही नव्या राज्यात असंतोष पसरला नाही आणि मूळ राज्यांमध्ये सुध्दा नाराजी पसरली नाही. मग तेलंगणाच्या बाबतीतच असे का व्हावे असा प्रश्न पडतो.
तेलंगण निर्मितीचा प्रश्न कॉंग्रेसने सोडवला आहे परंतु गेल्या ५०-६० वर्षापासून या पक्षाने तेलंगणाला विरोधच केलेला होता. म्हणजे तेलंगणाच्या बाबतीत कॉंग्रेसचे धोरण धरसोडीचे होते आणि प्रत्येक वेळी ते बदललेले आहे. धोरण बदलताना प्रत्येक वेळी एका समाज घटकाला काही तरी वेगळे आश्वासन दिलेले असते आणि प्रत्यक्ष निर्णय घेताना अशा कित्येक आश्वासनांना हरताळ ङ्गासावा लागतो. तीन राज्यांच्या निर्मितीत भाजपाचे धोरण तसे नव्हते. सुरूवाती पासून राज्य निर्मितीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सरकार या राज्यांच्या निर्मितीला अनुकूलच होते. भाजपाची या बाबतीतली भूमिका कधी बदलली नाही आणि तिच्या बाबतीत भाजपाने कधी धरसोडपणा केला नाही. कॉंग्रेसने तेलंगणाच्या बाबतीत हीच चूक केली. त्यामुळे कॉंगे्रसच्या या निर्णयानंतर असंतोष निर्माण झाला. आजवर कॉंग्रेसच्या नेत्यांनी सीमांध्रा भागातल्या लोकांना तेलंगण निर्मिती होणार नाही असेच वारंवार सांगितलेले होते. त्यामुळे आता तेलंगण निर्मिती झाल्यानंतर या लोकांना आपली ङ्गसवणूक झाली असे वाटत आहे आणि त्यातून आंदोलने निर्माण झाली आहेत. कॉंग्रेसने तेलंगणा निर्माण केला असला तरी पक्षाचा त्या मागचा हेतू राजकीय असल्याचे दिसले आहे.
तेलंगणा निर्माण केल्यास आपल्याला लोकसभेच्या किती जागा मिळतील याचा हिशोब करूनच कॉंग्रेसने हे पाऊल टाकले असल्याचे सर्वांच्या नजरेस आले आहे आणि कॉंग्रेसचा हा हेतू चांगला नसल्यामुळे लोकांचा तेलंगण निर्मितीच्या निर्णयाला म्हणावा तसा मनापासून पाठिंबा मिळालेला नाही. कॉंग्रेस पक्षाने हा निर्णय घेऊन तीन नव्या प्रश्नांची तयारी करून ठेवली आहे. आता नवे राज्य झाल्यानंतर पाण्याच्या वाटपाचे प्रश्न निर्माण होणार आहेत. शिवाय प्रशासन यंत्रणेच्या वाटपातसुध्दा वाद वाढणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हैदराबाद शहर हे वेगळ्याच वादाचे केंद्र होणार आहे. हैदराबाद शहराचे स्वरूप काय असावे या संबंधात आता दहा वर्ष तरी वाद होणार नाही असे कॉंग्रेसला वाटते. परंतु हैदराबादचा प्रश्न केवळ राजकीय नाही आर्थिकच जास्त आहे. आंध्र प्रदेशामध्ये असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांपैकी ७० टक्के उद्योग हैदराबाद-सिकंदराबाद या जोड शहरांमध्ये उभारलेले आहेत आणि माहिती तंत्रज्ञानातील ९५ टक्के उद्योग याच दोन शहरांच्या बाजूला आहेत. सीमांध्रा भागातल्या लोकांचे हितसंबंध या शहरात गुंतलेले आहेत. त्यामुळे हे सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे होतील आणि प्रदीर्घ काळ चालणार्या आंदोलनाच्या ज्वालात सीमांध्र भाग होरपळत राहील अशी चिन्हे दिसत आहेV.