अहमदनगरमध्ये चिंकारा हरणाची शिकार

अहमदनगर – जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील साकेगाव शिवारात चिंकारा हरणाची शिकार केल्याची खळबळजनक घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. साकेगाव शिवारात ग्रामपंचायतीचे 95 हेक्टर क्षेत्र गायरान जमीन आहे. आज सकाळी गोरक्ष सातपुते शेतात जात असताना 2 युवक हरणाची चिरफाड करत असल्याचे दिसून आले. मात्र त्या 2 युवकांनी सातपुते यांना पाहून पळ काढला.

माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे हरणाचे कातडे, हरणाचे 3 पाय आणि हरणाला पकडण्यासाठी लावलेले जाळे आढळून आले. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी हरणाचे पाय, कातडे आणि जाळे ताब्यात घेतले असून हे चिंकारा हरिण असल्याचे वन अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान 2 अज्ञात इसमांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण भांबरसे यांनी दिली. दरम्यान हरणाचे नमुने मुंबई येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहे. तर पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Comment