नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान सीमेवरील लडाख भागातील दौलत बेग ओल्डी या ठाण्याजवळ चीनने आपले सैन्य आणून बसवल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत भारताने चीनला या अतिक्रमणाची जाणीव दिली आणि त्यानंतर चीनने आपले सैन्य माघारी घेतले. या प्रकारानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत भारतीय लष्कराने प्रथमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या या चर्चेचा विषय झालेल्या ठाण्याजवळ आपल्या हवाई दलातील सुपर हर्क्युलस हे मालवाहू विमान तैनात केले आणि प्रथमच आक्रमक परंतु सुरक्षात्मक हालचाल केली.
अखेर भारताने चीनवर डोळे वटारले
भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनची सेना सातत्याने आक्रमक हालचाली करून भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहे. पण भारत त्याला सडेतोड जवाब सुद्धा देत नाही. दौलत बेग ओल्डी हे असे ठाणे होते की, जे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या १०० कि.मी. आत भारतीय हद्दीत होते. त्यामुळे या ठाण्यावर झालेल्या चीनच्या घुसखोरीमुळे मोठीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पण काल पहाटे भारताचे हे विमान या ठाण्याजवळ उतरवण्यात आले. त्यामुळे भारत चीनला मुहतोड जबाब देण्यास सिद्ध असल्याचे दिसून आले.
दौलत बेग ओल्डी ही जगातली सर्वात उंचावरची हवाईपट्टी आहे. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये तिचा वापर झाला होता. त्यानंतर २००८ साली तिचा पुन्हा एकदा वापर करण्याचा प्रयत्न झाला आणि या धावपट्टीवर ऍन्टोनोव्ह-३२ हे विमान उतरवण्यात आले. आता त्यावर पाच वर्षानंतर पुन्हा विमान उतरले आहे. भारत आणि चीन यांच्यात सध्या सीमेवरील तणावावरून चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असतानाच भारताने दौलत बेग ओल्डी जवळच्या हवाई पट्टीवर आपले विमान उतरवून चीनला एक धडा दिला आहे.
