फायली गहाळ होण्यावरून संसदेत गदारोळ

नवी दिल्ली -कोळसा खाणवाटपाशी संबंधित फायली गहाळ होण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी आज संसदेत केंद्र सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत झाले. त्यामुळे बहुचर्चित अन्न सुरक्षा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होेऊ शकली नाही.

कोळसा खाणवाटपाच्या फायलींवरून लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या स्पष्टीकरणाला महत्त्व देण्यास विरोधकांनी नकार दर्शवला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. गहाळ झालेल्या फायली शोधण्यासाठी कुठली कसर ठेवली जाणार नाही, अशी ग्वाही जयस्वाल यांनी राज्यसभेत दिली. याप्रकरणी आपण स्वत: दोषी आढळल्यास कुठलीही शिक्षा स्वीकारू, असेही ते म्हणाले. मात्र, जयस्वाल यांनी या मुद्दावर कुठलेही उत्तर देऊ नये. जयस्वाल यांचा संबंध असलेल्या कोळसा खाणवाटपातील लाभार्थ्याशी संबंधित फायली गहाळ झाल्याचे समजते, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.

लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसमधील काही बडी मंडळी गुंतलेली असल्यामुळेच फायली गहाळ झाल्याचा आरोप स्वराज यांनी केला. यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करतानाच पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. यादरम्यान तेलगू देसम पक्षाच्या तसेच आंध्र किनारपट्टी, रायलसीमा विभागांतील काँग्रेसच्या सदस्यांनी स्वतंत्र तेलंगण राज्याला विरोध दर्शवला. त्यामुळे गदारोळात भरच पडली. या गदारोळामुळे अन्न सुरक्षा विधेयकावर आज कुठलीही चर्चा होऊ शकली नाही.

दरम्यान, राज्यसभेत बोलताना जयस्वाल यांनी कोळसा खाणवाटपाशी संबंधित काही फायली गहाळ झाल्याची कबुली दिली. या फायली मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सीबीआयला हवी असलेली कागदपत्रे उपलब्ध केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गहाळ फायलींप्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच कुठली कारवाई करता येऊ शकेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. कोळसा खाणवाटप घोटाळ्याचा तपास करणार्‍या सीबीआयला सुमारे दीड लाख पानांचा समावेश असलेल्या 769 फायली आणि कागदपत्रे पुरवण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.