गुन्हेगारी जगतातील थरारनाटय … सूत्रधार

गुन्हेगारी विश्‍व आणि त्यांच्या शोधात असणारी पोलिस यंत्रणा यावर बेतलेल्या कथानकांवर आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती झालीय. कथेतील नाटय आणि घटनाक्रमांच्या अचूक मांडणीवर अशा चित्रपटांचा डौलारा उभा असतो. ‘स्वयंभू आर्टस’ प्रस्तुत ‘सूत्रधार’ या आगामी मराठी चित्रपटातून सस्पेन्स थ्रीलर कथानकाची धमाल अनुभवायला मिळणार आहे. एका दिवसात घडणा-या घटनाक्रमावर चित्रपटाचे संपूर्ण कथानक चित्रीत झाले आहे, हे या चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल. निर्माते विनोद रमेश पाटील, मिलींद साळवी, उमेश महाडिक, यश शेट्टी व धिरेन पोपट यांची एकत्रीत निर्मिती असलेल्या ‘सूत्रधार’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतिक कदम यांनी केले आहे. येत्या 30 ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय.

2000 कोटींचा सट्टा, 8 देश, 6 मोहरे, 1 खेळ, 1 विजेता आणि 1 सूत्रधार याच थरार नाटयावर बेतलाय ‘सूत्रधार’ हा मराठी चित्रपट. हया खेळातले सर्व मोहरे आपल्या मनाप्रमाणे चालवणारे, त्या मोह-यांच्या इच्छेविरुध्द आपला खेळ स्वत:ला हवा तसा घडवणारा खरा सूत्रधार सर्वाचं पितळ दुनियेसमोर उघडं पाडूनही स्वत: मात्र कायम पडद्याआडच राहीलाय. एका मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण-तरुणींच अपहरण होतं अन् मग सुरु झाला कधी न पाहिलेला न ऐकलेला असा एक रक्तरंजित खेळ… उत्कंठा वाढविणारी ही कथा म्हणजे ‘सूत्रधार’ हा चित्रपट. उत्सुकता वाढविणारं, कथानक अनिकेत के. यांनी लिहीले असून पटकथा – संवाद आणि छायाचित्रणही त्यांचेच आहे. प्रतिक कदम यांचा हा दुसरा चित्रपट असून या आधी ऐक या सस्पेन्स हॉररपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रतिक कदम व सुरज सिंग यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून आनंद मेनन यांचे संगीत आहे. चिन्मय मांडलेकर, विनय आपटे, अलका कुबल- आठल्ये, आदिती सारंगधर, सुशांत शेलार, पूर्वा पवार, प्रदीप पटवर्धन यांच्या भूमिका आहेत.

Leave a Comment