कालनिर्णयकार जयंतराव साळगांवकर यांचे निधन

मुंबई- कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचे मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे गेल्याक तीन दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपचार सुरू होते. आज दुपारी तीन वाजता दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साळगांवकरांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

जयंतरावांची तब्येत सोमवारी दुपारी एकदम खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र साळगांवकर यांचे एक-एक अवयव निकामी होत गेले. औषधांना प्रतिसाद मिळणे बंद झाले आणि पहाटे सव्वापाच वाजता जयंतराव साळगांवकर यांची प्राणज्योत मालवली.

सर्वसामान्यांपासून राजकारण, कला, साहित्य, पत्रकारिता, उद्योग आदी विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांशी साळगावकरांचा दांडगा संपर्क होता. साळगावकरांचे आतापर्यंत विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. देवदेवता आणि संतसाहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.

Leave a Comment