नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने मुस्लीम समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी काल केले आणि त्याच्या पाठोपाठ दिल्लीत पीस पार्टी या पक्षाचे सरचिटणीस एम.जे. खान यांनी आपल्या २०० सहकार्यांसह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाषण करताना राजनाथसिंह यांनी भारतीय जनता पार्टी जातीचे राजकारण करत नाही, असे प्रतिपादन केले.
२०० मुस्लीम कार्यकर्ते भाजपात
मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि गुजरात या भाजपा शासित राज्यातच मुस्लीम समाज अधिक सुरक्षित आहे, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर या राज्यातले मुस्लीम अधिक प्रगती करत आहेत, असेही भाजपाचे अध्यक्ष म्हणाले. गेल्या ६६ वर्षात मुस्लीम समाजाची भौतिक प्रगती का झाली नाही हा प्रश्न कॉंग्रेस पक्षालाच विचारला पाहिजे असे श्री. राजनाथसिंह म्हणाले.
एम.जे. खान यांचे भाजपात येणे ही भारताच्या राजकारणातली एक मोठी घटना ठरणार आहे, असे भाजपा अध्यक्षांनी म्हटले. तेव्हा उपस्थितांनी राजनाथसिंह आणि नरेंद्र मोदी यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.