महाराष्ट्रात पुरोगामी समाजसुधारणांचा विचार सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची हत्या व्हावी हा महाराष्ट्रातल्या पुरोगामीत्वाचा पराभव आहे. महाराष्ट्रात नवा विचार मांडणारांना विरोध होतो पण कालांतराने हाच विरोध करणारा समाज नवा विचार स्वीकारतो. त्याला सुरूवातीला विरोध होतो पण त्या विरोधापोटी कोणाची हत्या झालाीय असे कधी घडले नाही. महाराष्ट्रात समाजसुधारकाची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ती सर्वांना अस्वस्थ करणारी आहे. समाजात बदल घडवायचा असतो तेव्हा नवा विचार मांडावा लागतो. जुना विचार सोडावा लागतो. अशा वेळी समाजातले प्रतिगामी लोक जुने विचार छातीशी कवटाळून बसत असतात. त्यांना नवा विचार झेपत नाही. ते पुरोगामी विचाराला विरोध करतात. त्यातले काही लोक ङ्गारच आग्रही असतात. त्यांना नवा विचार मान्य नसतो, तसा विचार करणारांचा तो मांडण्याचा अधिकारही मान्य नसतो आणि पुढे जाऊन नवा विचार मांंडणारांचे जगणेही मान्य नसते. अशा ङ्गॅसिस्ट लोकांनी गेल्या काही दिवसांपासून डॉ. दाभोळकरांना अंध:श्रद्धा विरोधी विधेयकावरून धमक्या द्यायला सुरूवात केली होती. अशाच लोकांनी त्यांना मारले आहे.
पुरोगामी चळवळीला धक्का
या खुनाचा तपास करण्यात येत आहे आणि त्यामागे नेमके कोण आहेत हे तपासांतीच कळणार आहे पण गेल्या काही दिवसांतल्या धमक्या आणि दाभोळकरांच्या विचारां ऐवजी त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्याचे प्रकार पाहिले तर महाराष्ट्रात काही नव्याने उगवलेल्या संघटनांचा संशय येतो. अशा लोकांचा करील तेवढा निषेध कमीच आहे. दाभोळकरांचे महाराष्ट्राच्या वैचारिक चळचळीतले स्थान मोेठे होते. कारण त्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर खंडित झालेली विचार प्रबोधनाची परंपरा प्रतिकूल स्थितीतही जारी ठेवली होती. महाराष्ट्रात सामाजिक विचार मांडणार्यांची मोेठी परंपरा आहे पण ती खंडित झाली. या परंपरेतून महाराष्ट्रात अनेक तरुण प्रेरित झाले खरे मात्र एखादा तरुण सामाजिक भान येऊन थोडा कार्यरत झाला की त्याला राजकारणात शिरण्याचे वेध लागतात. म्हणून केवळ सामाजिक चळवळ करणारे नेतेच उरले नाहीत. ते काम डॉ. दाभोळकर यांंनी अखंड ठेवले होते. सामाजिक सुधारणांच्या परंपरेतल्या विचारवंतांना समाजातून विरोध झाला तसा तो दाभोळकरांनाही झाला पण त्यांनी आपल्या मांडणीत कधी नकारात्मकता येऊ दिली नाही. कोणाच्याही श्रद्धा न दुखवता ते केवळ सरळ सरळ दिसणार्या अंध:श्रद्धांवर विवेकाने वार करीत राहिले.
खरे तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ स्वातंत्र्यानंतर गतिमान व्हायला हवी होती आणि शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे ती अधिकच वेगाने पुढे जायला हवी होती पण तिला तसा वेग तर आला नाहीच पण समाजातला सुधारणांना विरोध करणारा वर्ग एवढा प्रखर झाला की आपल्याला न आवडणारे विचार मांडणारांना जगण्याचा अधिकार नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. असे का झाले याचा विचार नेत्यांनी आणि समाज धुरिणांनी करायला हवा. या मागे दोन कारणे स्पष्ट दिसतात. पहिले म्हणजे समाज सुधारणेविषयी चुकीच्या भावना निर्माण करण्यात आल्या. समाज सुधारणेचा विचार म्हणजे धर्म विरोधी विचार असा समज दृढ करण्यात आला. धर्माचा राजकारणासाठी वापर करणारांनी या समजाला खतपाणी घातले. धर्मातल्या कालबाह्य रुढींचे विश्लेषण करणे आणि अशास्त्रीय रुढींचा निषेध करणे म्हणजे धर्माचा अपमान आहे असा प्रचार करण्यात आला. धार्मिक उन्मादाने प्रेरित झालेला तरुण वर्ग सामाजिक चळचळीला विरोध करायला लागला आणि तसे करणे हेच धर्माचे कार्य आहे असे मानायला लागला. सामाजिक चळवळ सुरू असते तेव्हा ती करणारे लोक संख्येने कमी असतात आणि असे विपरीत धर्म कार्य करण्यात धन्यता मानणारे, सुधारणांना विरोध करणारे संख्येने जास्त असतात.
लोकांचे दगड खाऊन आणि प्रतारणा सहन करून जे लोक नवा विचार मांडतात ते संख्येने हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. सुधारणांना विरोध करणारे संख्येने जास्त असल्याने राजकीय नेते सुधारणांना उघडपणे पाठींबा देत नाहीत कारण त्यांना बहुसंख्यकांंची मते गमवायची नसतात. लोकांच्या हिताचा विचार लोकांनाच आधी कळत नाही. पण त्यांची नाराजी ओढवून घेऊन तो मांडत राहिले पाहिजे हा सुधारकांचा बाणा असतो पण राजकीय नेते लोकांना नाराज करीत नाहीत. त्यांना आवडेल ते बोलत राहतात. त्यांच्या हिताच्या पण त्यांना नाराज करणार्या जादूटोणा विरोधी विधेयकासारख्या विषयात राजकीय नेते नेहमीच बोटचेपेपणाची भूमिका घेतात. ती भूमिका चुकीची आहे हे त्यांना कळते पण मतांच्या स्वार्थापोटी ते सुधारणांचा मोकळेपणाने पुरस्कार करीत नाहीत परिणामी दाभोळकरांसारखे सुधारक एकटे पडतात आणि धार्मिक उन्मादापोटी त्यांना विरोध करणारांना, नेत्यांच्या सोयिस्कर मौनामुळे बळ मिळते. अशा या प्रक्रियेतच दाभोळकर यांचा बळी गेला आहे.