पीएफ खाते होणार ऑनलाईन हस्तांतरीत

नवी दिल्ली – भविष्यनिर्वाह निधीचे म्हणजेच पीएफ खात्याचे ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणार्‍या सुमारे 13 लाख पीएफ खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळे अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओने ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.

ही सेवा सुरू झाल्यानंतर पीएफ खात्याच्या हस्तांतराची मागणी कंपनीमार्फत ईपीएफओकडे ऑनलाईन नोंदविता येणार आहे. या सेवेसाठी ईपीएफओने सेंट्रल क्लिाअरन्स हाऊसची स्थापना केली आहे. या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांत पीएफखाते हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचा ईपीएफओचा मानस आहे.
काही निवडक कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना आजपासून ही ऑनलाईन सेवा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पीएफ खातेधारकांच्या डिजिटल स्वाक्षरीची नोंद करण्यास 25 जुलैपासूनच ईपीएफओने सुरुवात केली असून, त्याला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचार्‍यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पीएफ खाते हस्तांतर करण्याची सर्वाधिक मागणी आयटी कंपन्यांकडून येते. देशभरातील सुमारे 6.9 लाख कंपन्यांमधील कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे व्यवस्थापन ईपीएफओ करते.